उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी समान नागरी संहितेसंबंधी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. समान नागरी संहिता लागू करण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे धनखड यांनी आयआयटी गुवाहाटीच्या 25 व्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करताना म्हटले आहे.
घटनेच्या शिल्पकारांनी समान नागरी संहितेची गरज व्यक्त केली होती. समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आता आली आहे. घटनेतील कलम 44 मध्ये देश स्वत:च्या नागरिकांसाठी समान नागरी संहितेला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. समान नागरी संहितेची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली असून यात कुठलाच अडथळा किंवा विलंब होऊ शकत नसल्याचे उपराष्ट्रपतींनी सांगितले आहे.
उपराष्ट्रपती धनखड हे मंगळवारी आसाम दौऱ्यावर होते. आयआयटी गुवाहाटीच्या 25 व्या दीक्षांत सोहळ्यात त्यांनी भाग घेतला आहे. लोकप्रियो गोपीनाथ बोरदोलाई विमानतळावर राज्यपाल गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी उपराष्ट्रपती धनखड आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत केले हेते.
गृहमंत्र्यांना भेटले मुख्यमंत्री धामी
दुसरीकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. धामी यांनी तज्ञ समितीकडून समान नागरी संहितेच्या मसुद्याचे कार्य पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर याप्रकरणी शाह यांना विस्तृत माहिती दिली आहे. अहवाल प्राप्त होताच समान नागरी संहितेला कायद्याचे स्वरुप देत राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे धामी यांनी म्हटले आहे. धामी आणि अमित शाह यांच्यातील चर्चेदरम्यान तज्ञ समितीच्या अध्यक्ष न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई देखील उपस्थित होत्या असे बोलले जात आहे.









