एनएसईचा महाराष्ट्र सरकार आणि मनी बी या संस्थेसोबत सामंजस्य करार
वृत्तसंस्था /मुंबई
नॅशनल स्टॉक ऑफ इंडियाने (एनएसई) मंगळवारी (13 जून) उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र सरकार आणि मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा उद्देश भांडवली बाजारातील गुंतवणुकीच्या विविध पैलूंबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, गुंतवणूकदारांना अचूक आणि व्यावहारिक माहिती देणे हा असल्याचे सांगितले आहे.
आर्थिक साक्षरता ही काळाची गरज : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आर्थिक साक्षरता ही काळाची गरज आहे. एनएसई आणि मनी बी यांच्यात झालेल्या कराराद्वारे महाराष्ट्र सरकार लाखो लोकांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमाद्वारे सायबर फसवणूक टाळण्यासाठी, पॉन्झी योजनांबाबत जनजागृती करणे आणि गुंतवणूक कशी आणि कुठे करावी याबाबत मार्गदर्शन केले जाते. एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकार आणि मनी बी इन्स्टिट्यूटसोबत झालेला सामंजस्य करार हा गुंतवणूकदारांच्या जागरूकता आणि आर्थिक साक्षरतेसाठी आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. चांगले निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य माहिती देऊन सक्षम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी नमूद केले आहे.
आर्थिक साक्षरता मोहीम राबविणारे महाराष्ट्र हे पहिले ठरले : वखरे
मनी बी इन्स्टिट्यूटच्या संचालिका शिवानी दाणी वखरे म्हणाल्या, ठोस पद्धतीने आर्थिक साक्षरता अभियान सक्रियपणे राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने हा उपक्रम क्रांती घडवून आणेल. आर्थिक विकासाला चालना देण्यात भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका बजावत असतो.









