बेळगाव जिल्ह्यात तब्बल 4 लाख सातबारा उताऱ्यांवर मयतांची नावे : महसूल खात्याचा पुढाकार
अमृत वेताळ/बेळगाव
वारसदारांनी वर्षानुवर्षे वारसा करून घेण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने सातबारा उताऱ्यावर अद्यापही मोठ्या प्रमाणात मयतांची नावे तशीच आहेत. बेळगाव जिल्ह्यात तब्बल 4 लाख 75 हजार 625 उताऱ्यांवर मयतांची नावे असल्याचे समोर आले आहे. तर राज्यात तब्बल 50 लाख सातबारा उताऱ्यांवर मयतांची नावे आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यव्यापी ‘वारसा मोहीम’ हाती घेतली आहे. त्यानुसार तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तलाठी व त्यांचे सहकारी संबंधित ग्रा. पं. मध्ये जाऊन वारसदारांची माहिती घेत त्यांची नावे सातबारा उताऱ्यावर दाखल करणार आहेत.
घरच्या कर्त्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर संबंधिताच्या वारसदारांनी वारसाप्रमाणे आपली नावे सातबारा उताऱ्यावर दाखल करून घेणे गरजेचे असते. मात्र याकडे अनेक जणांनी दुर्लक्ष केले असल्याचे समोर आले आहे. राज्यात 4,20,01,943 इतक्या जमीन मालकांनी आधार लिंक करून घेणे गरजेचे असल्याचे महसूल खात्याचे म्हणणे आहे. मात्र यापैकी 2,25,40,759 जमीन मालकांनी सातबारा उताऱ्याला आधार लिंक करून घेतले आहे. यापैकी 52,40,072 जमीन मालकांचे निधन झाले आहे. मयतांची नावे मोठ्या प्रमाणात सातबारा उताऱ्यावर तशीच आहेत. अलीकडेच महसूल खात्याकडून सातबारा उताऱ्याला आधार लिंक करण्याचे काम हाती घेतल्यानंतर ही माहिती पुढे आली आहे.
सातबारा उताऱ्यावर मयतांची नावे असल्याने वारसदारांना तसेच कुटुंबातील सदस्यांना सरकारच्या सोयीसुविधांपासून दूर रहावे लागत आहे. बँक कर्ज त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर भरपाईसाठी अर्ज दाखल करताना अडचणी येत आहेत. वारसदारांची नावे सातबारा उताऱ्यावर दाखल करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर घरोघरी भेट देऊन वारसा मोहीम हावेरी आणि गदग जिल्ह्यात सर्वप्रथम राबविण्यात आली. त्याठिकाणी हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता संपूर्ण राज्यात याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वारसा मोहीम राबविण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. डिजिटलायजेशनच्या माध्यमातून कागदपत्रे दाखल करून घेतली जाणार आहेत. ग्रा. पं. ना तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी व त्यांचे सहकारी भेट देऊन वारसा मोहीम राबविणार आहेत. याबाबत सर्वांना माहिती मिळावी यासाठी ग्रा. पं. च्या माध्यमातून गावागावात दवंडी पेटविली जाणार आहे. वारसदारांकडून माहिती घेण्यासह वंशावळ तपासली जाणार आहे. त्याचबरोबर मालमत्ता संबंधी अन्य प्रश्नांवरही त्याठिकाणी तोडगा काढला जाणार आहे.
वारसा मोहिमेला सुरुवात
राज्य सरकारच्या सूचनेनुसार बेळगाव तालुक्यातील वारसा मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवार दि. 21 पासून हे काम सुरू झाले असून ज्या कोणी सातबारा उताऱ्यावर वारसानुसार नावे दाखल करून घेतली नाहीत त्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. ग्रा. पं. मध्ये येणाऱ्या तलाठी व अधिकाऱ्यांकडे माहिती व कागदपत्रे द्यावीत. त्यानुसार वारसदारांची नावे सातबारा उताऱ्यावर दाखल केली जातील.
– सुभाष असोदे,द्वितीय दर्जा तहसीलदार बेळगाव









