नव्याने प्रचलित झालेल्या व तुलनेने अल्पावधीत प्रचारित झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या व अनेकार्थांनी उपयुक्त कार्यपद्धतीचा यशस्वी वापर आता हरित ऊर्जा क्षेत्रात सुद्धा यशस्वी ठरला आहे. हरित ऊर्जा क्षेत्र हे पर्यावरण रक्षणापासून आर्थिक संदर्भातील प्रमुख व क्षमतावान क्षेत्र असून त्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची साथ मिळाल्याने सर्वच क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना आता नाविन्यासह नवी दिशा प्राप्त झाली हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
सकृतदर्शनी स्पष्ट होणारी बाब म्हणजे आज देशांतर्गत उर्जेची गरज व त्याचा वापर वाढत्या प्रमाणावर होत असतानाच कृत्रिम बुद्धिमत्तेची वाढ होत आहे व त्याचा प्रसार-प्रचार पण होत आहे. त्याचवेळी देशांतर्गत ऊर्जा क्षेत्रात हरित उर्जेला प्रेरणा, प्रोत्साहन व सरकारी स्तरावर समर्थन मिळत आहे. ही धोरणात्मक बाब सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरासाठी पूरक ठरणारी आहे.
यासंदर्भातील मुलभूत व महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी व उपयुक्त वापरासाठी सतत वीज वापराची आवश्यकता असते. उर्जेची ही मुख्य गरज पवन ऊर्जा वा सौर ऊर्जा यासारखे ऊर्जा स्रोत सहजगत्या व तुलनेने कमी खर्चात पूर्ण करू शकतात, ही बाब महत्त्वाची आहे. एका आकडेवारीनुसार पुढील 5 वर्षात जागतिक पातळीवरील ऊर्जा वापरातील सुमारे 5 टक्के वीज ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी व सतत उपलब्ध होण्याच्या तत्वावर वापरली जाईल. त्या दृष्टीने पण नजिकच्या भविष्यात हरित उर्जेचे यासंदर्भातील महत्त्व पुन्हा स्पष्ट होते.
सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार, प्रचार आणि वापर वाढत्या प्रमाणावर होत असून त्यासाठी आवश्यक वीज हरित ऊर्जा क्षेत्रातून सहजगत्या व अधिक परिणामकारक वीज निर्मिती होऊ शकते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे सौर वा पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील नव्या प्रकल्पांची उभारणी परंपरागत ऊर्जा निर्मिती क्षेत्राच्या उभारणीच्या तुलनेत कमी वेळात होऊ शकते. या कमी खर्चिक व वेळ वाचवणाऱ्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचा फायदा प्रगत व नव्या स्वरुपातील कृत्रिम बुद्धिमत्ता व त्यावर आधारित विशेष व्यावसायिक क्षेत्राला सहजगत्या व किफायतशीर स्वरुपात होऊ शकतो. भारतीय स्तरावर यासंदर्भात सांगायचे म्हणजे आपल्याकडे तर 2030 पर्यंत हरित ऊर्जा क्षेत्रातील वीज निर्मिती व त्याच्या उपयोगामध्ये 50 टक्के वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
आज भारताचे प्रकल्प व्यवस्थापन त्याच्या क्षमता व कार्यक्षमतेच्या आधारे जगात अव्वल ठरले असून याचा लाभ हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्राला सहजगत्या व निश्चितपणे होणार आहे, ही एक जमेची बाजू म्हणायला हवी. याच्याच जोडीला आपल्याकडे संकरित स्वरुपातील म्हणजेच पवन-सौर ऊर्जा एकत्रित स्वरुपात निर्मिती व कार्यरत आहेत. सौर उर्जेच्या संदर्भातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आपल्याकडील भौगोलिक रचना व वातावरणीय स्थितीनुसार वर्षातील सुमारे 300 दिवस सौर उर्जेसाठी आवश्यक असा सूर्यप्रकाश सहजतेने व सुलभपणे उपलब्ध होतो. जागतिक ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भात भारताच्या दृष्टीने विशेष जमेची ठरली आहे. याच्याच जोडीला पूर्वीच्या प्रादेशिक वा राज्यस्तरीय वीज पारेषण म्हणजेच dरऊर्जा संचाराला आता राष्ट्रीय ऊर्जा पारेषण पद्धतीची जोड मिळाली असून ही बाब हरित ऊर्जा क्षेत्रासाठी पण लाभदायी ठरली आहे.
दरम्यान आपल्याकडील कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवसायवाढीने आता गती पकडली आहे. सध्या देशांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्टार्टअपची संख्या 1000 वर पोहोचली असून आजमितीस या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांपैकी 20 टक्के संख्या भारतात आहे हे विशेष. याला साथ मिळत आहे ती वाढत्या संगणकीय सेवा आणि शिक्षणाची.
याचवेळी वाढत्या व्यावसायिक गरजा आणि मागणीनुसार आपल्याकडील डेटा मॅनेजमेंट व्यवसायाला पण अनेकार्थांनी ‘अच्छे दिन’ आले आहेत. यासंदर्भात मार्केटस अँड मार्केटस तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्यातील त्यांच्या माहिती संकलन व प्रक्रिया केंद्रामध्ये पूर्णपणे सौर उर्जेचा वापर केला जात आहे. या केंद्राचा सल्ला सेवा घेणाऱ्या अनेक ग्राहकांनी सौर उर्जेच्या संदर्भात त्यांचे अनुकरण करण्यामध्ये रुची दाखविली आहे. त्यांच्या अनुभवानुसार संगणक प्रक्रिया केंद्रांसारख्या महत्त्वाच्या व सतत प्रक्रिया स्वरुपात चालणाऱ्या व्यवसायांमध्ये सौर उर्जेचा वापर आर्थिकदृष्ट्या सुद्धा किफायतशीर ठरणारा आहे. असाच यशस्वी अनुभव हैद्राबाद येथील जागतिक माहिती प्रक्रिया केंद्राच्या ऊर्जा वापरासाठी सौर ऊर्जा वापराद्वारे करण्यात येत आहे.
यातूनच आता भारतातील इतर ठिकाणच्या प्रमुख व अन्य ठिकाणच्या माहिती संकलन-प्रक्रिया केंद्रांचे संचालन सौर वा हरित उर्जेच्या वापरातून करण्यावर आता भर दिला जात आहे. असे केल्याने पर्यावरण संरक्षणापासून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी आवश्यक असा सतत वीज पुरवठा व मुख्य म्हणजे माफक खर्चामध्ये उर्जेची उपलब्धता यासारखे प्रमुख त्रिविध फायदे होत असून त्याकडे जगातील प्रमुख व प्रगत व्यवसाय उत्सुकतेसह आशावाद घेऊन पहात आहेत, हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. अर्थात देशांतर्गत हरित ऊर्जा प्रयोग आणि उपयोगाच्या या पहिल्याच व यशस्वी प्रयोगावरच संपूर्ण समाधान मानणे योग्य ठरणारे नाही.
अर्थात ही तर एक अनुभवसिद्ध बाब आहे की, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन यासारख्या क्षेत्रात कुठलीही नवी बाब वा नवे तंत्र विकसित करून त्यांचा प्रथमच व विशेषत: व्यावसायिक स्तरावर व यशस्वीपणे वापर करण्यासाठी संबंधित विषयातील अद्ययावत माहिती व ज्ञान यांच्या जोडीलाच त्या विषयातील कुशल-कौशल्यांची वेळेत जोड मिळणे तेवढेच महत्त्वाचे असते. या कौशल्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान, माहिती संकलन व प्रक्रिया या विशेष व नव्या कौशल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ही विशेष कार्य-कौशल्यांशी संबंधित कामकाज असणारी क्षेत्रं नवी असल्याने या क्षेत्रांमध्ये काम करणारे कसबी व अनुभवी लोक अत्यल्प संख्येत उपलब्ध नसल्याने अनुभवी व कौशल्ययुक्त कर्मचाऱ्यांची उणीव भासणे स्वाभाविक आहे.
मात्र या संदर्भातील भारताच्या दृष्टीने महत्त्वाची व विशेष जमेची बाब म्हणजे सौर उर्जेसह पवन ऊर्जा व त्याद्वारे हरित ऊर्जा क्षेत्रात अव्वलता व गुणवत्तेसह चांगलेच बस्तान बसविले आहे. स्टार्टअप पासून सरकारी क्षेत्रातील व कॉर्पोरेट ऊर्जा कंपन्यांनी हरित ऊर्जा क्षेत्राचे व्यावसायिक महत्त्व यापूर्वीच समजून घेतले आहे. या व्यावसायिक प्रयत्न आणि पुढाकाराला आता नव्याने सरकारी मदत व प्रोत्साहन मिळावे यासाठी धोरणात्मक निर्णय झाले असून या निर्णयांची केंद्र व राज्य स्तरांवर अंमलबजावणी सुरु झाली आहे.
या साऱ्या उत्साहवर्धक व फलदायी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी प्राधान्य तत्वावर व पुढाकारासह काम करण्यासारखी बाब म्हणजे भारतातील प्रस्थापित हरित ऊर्जा क्षेत्राच्या गती व प्रगतीच्या पार्श्वभूमीवर त्याचा उपयोग प्रगत स्वरुपातील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा व्यावसायिक विकास करणे भारत व भारतीयांसाठी फलदायी व जागतिक संदर्भात नव्याने मार्गदर्शक ठरणार आहे.
दत्तात्रय आंबुलकर








