तालुक्यातील शेतकरी बचाव संघटनेचे आवाहन : समावेश होणाऱ्या गावांचा कारभार बुडा सांभाळणार
वार्ताहर /किणये
एकीकडे तालुक्यात रिंगरोडसाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळकावण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू ठेवला आहे. रिंगरोड प्रस्तावाला शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध करण्यात येत आहे. अशी परिस्थिती असताना आता बेळगाव शहर विकास प्राधिकरण बुडा यांच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील 28 गावांचा नव्याने समावेश करण्याच्या हालचाली बुडाणे सुरू केल्या आहेत. आता बुडाविरोधात ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. असे आवाहन तालुक्यातील शेतकरी बचाव संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
शेतकरी बचाव संघटनेचे नेते शिवाजी सुंठकर, निंगापा जाधव, पुंडलिक पावशे यांनी तालुक्याच्या विविध गावांना भेट देऊन ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत माहिती देऊन पत्रके दिली आहेत. आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गावांचा बुडामध्ये समावेश करून घेऊ नये असा ठराव मंजूर करावा अशी माहितीही देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी शेतकरी बचाव संघटनेच्या या नेतेमंडळींनी पश्चिम भाग व अन्य परिसरातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन याबाबतची माहिती दिली आहे. नगरविकास खाते, कर्नाटक बेळगाव बुडाणे आपले कार्यक्षेत्र वाढविण्यासाठी शहराजवळील 28 गावांचा बुडामध्ये समावेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याची अधिसूचनाही काही ठिकाणी दिली आहे. ज्या गावांचा बुडामध्ये समावेश होणार आहे. त्या ग्राम पंचायतींचा कारभार आता बुडामध्ये होणार असल्यामुळे याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. घर बांधणीसाठी बुडाची एनओसी घेणे बंधनकारक राहणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घर बांधणेही अवघड होणार आहे. त्यामुळे बुडाला आपापल्या गावातून विरोध होणे आवश्यक आहे. गावांचा बुडामध्ये समावेश झाल्यास नागरिकांच्या अडचणीत भर पडणार आहे. याची चिंता आतापासूनच नागरिकांना लागून राहिली आहे.
आता संघटितपणे लढा उभारा
गावांचा बुडाने समावेश करून घेऊ नये अशी तालुक्यातील शेतकरी बचाव संघटनेची मागणी आहे. त्यानुसार आता तालुक्याच्या या गावांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य शेतकरी बचाव संघटनेच्या नेते मंडळींनी सुरू केले आहे. त्यामुळे बुडाविरोधात आता नागरिकांनी संघटितपणे लढा उभारण्याची गरज आहे असे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सांगितले. बुधवारी सकाळी किणये ग्रामपंचायतीला भेट देऊन याबाबतचे पत्र दिले आहे. यावेळी माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, पुंडलिक पावशे उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य मारुती डुकरे, श्रीधर गुरव, निवृती डुकरे, महादेव पाटील आदींसह शेतकरीही उपस्थित होते.









