पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर संकट : तालुक्याच्या पूर्वभागातील भातपेरण्यांचे वेळापत्रक कोलमडले
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्ग गोंधळून गेला आहे. त्यामुळे सध्या शेतकरीवर्ग सोयाबीन व भाजीपाला पिकाकडे वळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पूर्वभागातील बसवण कुडची, शिंदोळी, बसरीकट्टी, निलजी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, मोदगा भागात मोठ्याप्रमाणावर दरवर्षी धूळवाफ पेरणी करतात. साधारण मे महिन्याच्या शेवटला व जून महिन्यामध्ये धूळवाफ पेरण्या केल्या जातात. सध्या काही तुरळक पावसाच्या सरी वगळता पूर्ण जून महिना कोरडा गेला आहे. त्यामुळे पूर्वभागातील भातपेरण्यांचे वेळापत्रकच कोलमडून गेले आहे. काही शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे वेळेवर धूळवाफ पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र पाऊस वेळेवर न झाल्याने बियाणांचे नुकसान होऊन त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर काही शेतकऱ्यांनी अजूनही पाऊस येईल या भरवशावर भातपेरणी सुरूच ठेवली आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन व भाजीपाला पिके घेणेच पसंत केले आहे. मागील काही वर्षांमध्ये पूर्वभागामध्ये दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकरीवर्गाने सोयाबीन पीक घेणे टाळले होते. मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरीवर्ग पुन्हा कमी पाण्यावर येणाऱ्या सोयाबीन पिकाकडे वळल्याचे पहावयास मिळत आहे. तर यापुढे जास्त पाऊस झाल्यास रोप लागवड करण्याची तयारीही काही शेतकऱ्यांनी केलेली आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता पूर्वभागातील शेतकरी पुरता गोंधळून गेल्याचे पहावयास मिळत आहे.
भाजी उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढीमुळे दिलासा
सध्या पाऊस लांबत चालल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भाजी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीसह इतर सर्व भाजीपाल्यांचे दर सध्या वाढलेले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. परंतू भाजीपाल्यांच्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर काहीसा भार पडला आहे.
भूजल पातळी अजूनही खालावलेलीच
जुलै महिन्यात झालेल्या एक दोन मोठ्या पावसाच्या सरी वगळता अद्याप पूर्व भागात एकही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पूर्वगातील तलाव, विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे भूजल पातळी अजूनही खालावलेलीच आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
कडक उन्हामुळे भातरोप लागवडीत व्यत्यय
उचगाव : बेळगाव तालुक्यामध्ये उशिरा सुरू झालेली भातरोप लागवड करत असताना सोमवारी कडक ऊन पडू लागल्याने पुन्हा एकदा भातरोप लागवडीत व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात अडकल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. चालूवर्षीचा हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने पोषक नसल्याने प्रत्येक पिकाला धोक्याचेच सावट जाणवू लागले आहे. चार-पाच दिवसात पावसाची रिमझिम सुरू झाल्याने ज्या पाणथळ जमिनीत पाणी साचू लागले अशा जमिनीमध्ये चिखल करून रोप लागवडीला प्रारंभ केले होते. मात्र पुन्हा सोमवारी कडक ऊन पडू लागल्याने रोपलागवडीला खीळ बसली आहे. सोमवारी सकाळी शेतकरी शेतावर पोचले, मात्र भाताची रोपे उपटून ती लावण्या अगोदरच ठेवण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आली. जमिनीत ओलावा आहे. मात्र चिखल-पाणी झाल्याशिवाय रोप लागवड यशस्वी होत नाही. यासाठी शेतवडीत पाणी आणि चिखल करण्यासाठी पॉवर ट्रिलर, ट्रॅक्टरचा उपयोग शेतकरी करत होते. मात्र पाणीच नसल्याने भातरोप लागवड अनेक शेतकऱ्यांनी थांबवल्याचे दिसून येत होते. ज्या भागात साधारण पाणी झाले आहे अशा ठिकाणी रोप लागवडीला सुरुवात केली होती. मात्र असेच ऊन पडू लागले तर लावलेली रोपे जगतील काय, अशा संभ्रमात शेतकरी आहे.