दोन महिन्यांवर गणेशोत्सव : आतापासून मूर्ती सांगण्यासाठी हालचाली : भक्तांत उत्साही वातावरण
बेळगाव : गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. बेळगावात सध्या बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू झाली आहे. अनेक मूर्तिकार कामाला लागले असून आतापासून घरगुती व मंडळांच्या मूर्ती सांगण्यासाठी पदाधिकाऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. सारेच मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या लगबगीत असल्याचे चित्र सध्या शहर परिसरात पाहावयास मिळत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही मूर्तिकार विविध स्वऊपातील मूर्ती साकारण्यात गुंतले असून सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीही करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. विशेषत: माती व शाडूच्या मूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांचा अधिक कल आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आतापासूनच गणरायांच्या आगमनाची चाहूल लागून राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बेळगावात गणेश चतुर्थी पुणे आणि मुंबईच्या पार्श्वभूमीवर साजरी केली जाते. मागील वर्षीपेक्षा यावर्षी मूर्तींची मागणी वाढल्याचे मूर्तिकारांतून सांगण्यात येत आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात किंचीत वाढ झाली आहे. यामुळे यावर्षी अधिक मूर्ती बनविण्यास सुऊवात केली असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. बेळगावातील गणेशोत्सव अनेकांना भुरळ घालतो. गोवा, महाराष्ट्रातील लोक गणेशमूर्ती पाहण्यासाठी बेळगावात येतात. सध्या सर्वच मूर्तिकार मूर्ती बनविण्याकडे वळले आहेत. याबाबत विचारले असता शाडूची मूर्ती ही अधिक वजनाची असते. यामुळे कलाकुसर करण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागते. नवीन कारागिरांना मूर्ती घडविणे कठीण होत असले तरी माती व इतर साहित्याच्या साहाय्याने आता निसर्गाला धोका निर्माण होणार नाही, अशा मूर्ती बनविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. मुंबई आणि कोल्हापूर येथील नवनवीन आकर्षक मूर्ती आणण्यात येत आहेत. सार्वजनिक मूर्ती बनविण्यास सुऊवात करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशमूर्ती साकारण्यासाठी परराज्यांतील कामगारांनाही बोलाविण्यात येते. बेळगावात ठिकठिकाणी तंबू ठोकून मूर्ती बनविण्याची तयारी सुरू आहे. मागील वर्षी केलेल्या बुकिंगप्रमाणे यावर्षी सार्वजनिक मंडळांची मागणी लक्षात घेता मंडळांनीही आतापासूनच तयारी सुरू केली आहे. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांवर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक मूर्तिकार आता कामात गुंतले आहेत. काहींनी रंगकामही हाती घेतल्याचे दिसून येत आहे.
महिलांचाही रंगकामात सहभाग
रंगरंगोटीच्या कामासाठी परराज्यांतून अनेक कामगार मागविण्यात येतात. मात्र, तेदेखील अपुरे पडत आहेत. यामुळे कुटुंबातील साऱ्यांनाच या कामात हातभार लावावा लागत आहे. मूर्तिकारांच्या कुटुंबातील महिलाही सध्या गणेशमूर्ती रंगविण्यात आघाडीवर आहेत.
सर्वांचेच आराध्यदैवत- मूर्तिकार विशाल गोदे
गणेश हे सर्वांचेच आराध्यदैवत मानले जाते. त्यामुळे हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षीही विविध स्वरुपातील गणेशमूर्ती साकारण्यासाठी आपण प्रयत्न चालविले आहेत. विशेषकरून चिंतामणी, रिद्धी-सिद्धी, गजराज यासह इतर मूर्तींवर आपण भर दिला आहे. भाविकांच्या मागणीप्रमाणे मूर्ती बनवून देण्याकडे आपला कल आहे.









