प्रति नग 35 ते 40 रुपये : गृहिणींना मोठ्या प्रमाणात फटका
बेळगाव : वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीनी जनता हैराण झाली असतानाच आता दैनंदिन आहारात लागणाऱ्या नारळाच्या किंमतीही भरमसाट वाढल्या आहेत. किरकोळ बाजारात नारळासाठी 35 ते 40 रूपये मोजावे लागत आहेत. कडधान्य, डाळी अन् खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली असतानाच आता नारळाने देखील भाव खाल्ला आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून नारळांच्या किंमतीत हळूहळू वाढ होऊ लागली आहे. एरव्ही 15 ते 20 रुपयाला मिळणारा नारळ आता 35 ते 40 रुपये झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक हॉटेल आणि गृहिणींच्या बजेटवरही परिणाम झाला आहे. दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात नारळाचा वापर केला जातो. त्यामुळे नारळाला मागणी कायम असते. मात्र नारळाच्या दरात उच्चांकी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांनाही याचा फटका बसू लागला आहे. कडधान्य, डाळी आणि खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कडधान्य, डाळींनी दीडशतक गाठले आहे. विशेषत: तुरडाळ प्रति किलो 190 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यातच आता नारळांच्या किंमतीही वाढल्याने सर्व सामान्यांच्या च्ंिांतेत भर पडली आहे. यात्रा, जत्रा तोंडावर आल्याने नारळांची मागणी वाढू लागली आहे. मात्र वाढत्या दराचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे.
खोबरे, शहाळांच्या भावात तेजी
पुजेच्या नारळासोबत खोबरे व शहाळांच्या भावामध्येही तेजी दिसत आहे. 120 ते 140 प्रतिकिलो मिळणारे खोबरे 190 ते 200 रुपये किलो झाले आहे. तर 40 रुपये मिळणारे शहाळे (ओला नारळ) 50 ते 60 रुपये झाला आहे.









