प्रति युनिट पाच ते दहा पैसे वाढीची शक्यता : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
विजेच्या वापरासाठी गोमंतकीयांना यापुढे प्रति युनिट 5 ते 10 पैसे जादा भरावे लागणार असून दरवाढीसंबंधीची फाईल मुख्यमंत्र्यांनी मंजुरही केली आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अनौपचारिकरित्या ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकार वीज बिलात प्रति युनिट 5 ते 10 पैसे वाढ करण्याच्या विचारात असून येत्या आठ दिवसात त्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच दरवाढ लागू होणार आहे. घरगुती तसेच औद्योगिक अशा सर्व घटकांना ही दरवाढ लागू होणार आहे, असे त्यांना सांगितले.
कोरोनामुळे टळली होती दरवाढ
राज्यात वीज दरवाढ लागू करणे अपरिहार्य होते. 2019 मध्येच संयुक्त वीज नियमन आयोगानेही दरवाढ सूचविली होती. परंतु कोरोनामुळे सरकारने त्याची अंमलबजावणी केली नव्हती. आताही ती केली नाही तर भूमिगत वीजवाहिन्या तसेच अन्य कामे करणे शक्य होणार नाही, असे ढवळीकर म्हणाले.
सौर उर्जेवरील विजेला देणार प्राधान्य
फर्मागुडी येथे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात 1 मेगा वॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहे. त्याशिवाय सर्व सरकारी खात्यांच्या इमारतींवर सौर पॅनल बसविण्यात येणार असून त्याद्वारे सर्व खात्यांची वीज व्यवस्था सौरउर्जेवर चालणार आहे. अशाप्रकारे मोठय़ा प्रमाणात सौरउर्जा निर्माण झाल्यामुळे भविष्यात घरगुती वापरासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध होऊन सर्वांना 24 तास वीज पुरवठा करणे शक्य होईल, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.
पुढील पाच वर्षात राज्यातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार असून त्यावर सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वेर्णा, सांकवाळ, फोंडा, आदी ठिकाणी नवीन वीज उपकेंद्रे स्थापन करण्यात येतील, असेही ढवळीकर यांनी सांगितले.









