बेळगावमध्ये स्मार्ट वीजमीटर कार्यान्वित : एक हजार मीटर दाखल
स्मार्ट वीजमीटर…
- वीजमीटरमध्ये जीपीआरएस सिस्टीमचा वापर
- प्रीपेड व पोस्टपेड असे दोन पर्याय उपलब्ध
- मोबाईलप्रमाणे मीटरला आयएमईआय क्रमांक
- 1 सप्टेंबरपासून स्मार्ट मीटर सक्तीचा
वीजमीटरचे दर…
- सिंगल फेज 4786 रुपये
- थ्री फेज 8423 रुपये
सुशांत कुरंगी/बेळगाव
आता मोबाईलप्रमाणेच वीजमीटरलाही रिचार्ज करावा लागणार आहे. हेस्कॉमने आपल्या वीजव्यवस्थेत 1 सप्टेंबरपासून नवीन बदल केले आहेत. नवीन ग्राहकांना यापुढे स्मार्ट मीटर दिला जाणार आहे. जीपीआरएस यंत्रणा या स्मार्ट मीटरमध्ये कार्यान्वित असून प्रीपेड तसेच पोस्टपेड वीजबिल भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बेळगावमध्ये एकूण 1 हजार स्मार्ट वीजमीटर दाखल झाले असून यापुढे शहर तसेच तालुक्यामध्येही हे मीटर बसविले जाणार आहेत. वीजयंत्रणा स्मार्ट व्हावी, यासाठी संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर बसविले जाणार असल्याचे दोन वर्षांपूर्वी सांगण्यात आले होते. काही राज्यांनी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध केल्यामुळे काही दिवस ही यंत्रणा थांबली होती. कर्नाटक सरकारने स्मार्ट मीटर बसविण्यास मंजुरी दिल्याने बेंगळूर येथे प्रायोगिक तत्त्वावर मीटर बसविण्यात आले होते. आता 1 सप्टेंबरपासून बेळगावसह हुबळी व अन्य जिल्ह्यांमध्ये हेस्कॉमने स्मार्ट मीटर बसविणे सक्तीचे केले आहे.
नवीन वीज ग्राहकांना सक्तीने स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. मीटरमध्ये जीपीआरएस सिस्टीम असून त्यामध्ये एक सीमकार्ड देण्यात आले आहे. त्याबरोबरच मोबाईलप्रमाणे आयएमईआय नंबर देण्यात आला आहे. ग्राहकांना प्रीपेड व पोस्टपेड असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. प्रीपेडमध्ये मोबाईलप्रमाणे आधी रिचार्ज करून त्यानंतर त्यातील रक्कम कापली जाणार आहे तर पोस्टपेडमध्ये वापरलेल्या विजेच्या बिलाची रक्कम एकदाच भरावी लागेल. हुबळी विभागाने स्नायडर्स कंपनीला याचे कंत्राट दिले होते. मंगळवारी रेल्वेस्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालय येथे नवे 1 हजार स्मार्ट मीटर विक्रीसाठी दाखल झाले. यामध्ये 850 सिंगल फेज, 150 थ्रीफेज व इतर ईटीव्ही मीटर आहेत. सिंगल फेजसाठी 4786 रुपये तर थ्रीफेजसाठी 8423 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. यापूर्वी हेस्कॉमने घरबांधणीसाठी प्रीपेड मीटरची सक्ती केली होती. त्याच पद्धतीने हे स्मार्ट मीटर कार्यान्वित केले जाणार आहेत.
गृहज्योतीचाही लाभ घेता येणार
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार की नाही? असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात होता. टेम्पररी वीजकनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना गृहज्योतीचा लाभ मिळणार नाही. परंतु, कायमस्वरुपी कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांना मात्र गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच यापुढे नवीन ग्राहकांना सक्तीचे स्मार्ट मीटरच केईआरसीच्या नियमावलीनुसार बसविले जाणार असल्याचे हेस्कॉमने स्पष्ट केले आहे.
नवीन ग्राहकांना उपलब्ध
नवीन वीज ग्राहकांना यापुढे स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. दोन दिवसांपूर्वी बेळगावमध्ये हे मीटर दाखल झाले आहेत. संबंधित कंपनीकडून मीटरच्या वापरासंदर्भात हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. मोबाईलप्रमाणे स्मार्ट मीटरला रिचार्ज करता येणार आहे. सुटीच्या दिवशी जरी रिचार्ज संपला असला तरी तो मीटर डिस्कनेक्ट होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
– मनोहर सुतार (कार्यकारी अभियंता हेस्कॉम शहर)










