सर्व ग्राहकांना देणार स्मार्ट वीज मीटर : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
मंत्रिमंडळाचे अन्य निर्णय
- डॉ.श्यामाप्रसादमुखर्जीस्टेडियम भाडेपट्टीवर
- विकसितगोवाचेलक्ष्य अगोदरच पूर्ण करणार
- स्वतंत्रपाणीखात्याच्या नियमांना मान्यता
- होमिओपॅथीकडॉक्टरांसाठीनेंदणी सक्तीची
- आयुर्वेद, होमिओपॅथीकमहाविद्यालयांनाअनुदान
- न्हावेली- सांखळीयेथेकिर्लोस्कर कंपनीस जागा
पणजी : राज्यातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांसाठी आता स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यासाठी सरकारने डिजीस्मार्ट नेटवर्क प्रा. लि. या कंपनीची नेमणूक केली आहे. पहिल्या टप्प्यात व्यावसायिक आणि थ्री फेज ग्राहकांचे मीटर बदलण्यात येणार असून त्यानंतर इतर ग्राहकांचे मीटर बदलले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. काल गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. त्यांनी पुढे सांगितले की, गोव्यात सुमारे साडेसात लाख वीज मीटर असून ते सर्व बदलून त्यांच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत.
डॉ. मुखर्जी स्टेडियम भाडेपट्टीवर
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम भाड्याने देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. सरकारी कार्यक्रमांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. मुखर्जी स्टेडियम डोम एंटरप्रायझेस प्रा. लि. या कंपनीस भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारी कार्यक्रम वगळून इतर कार्यक्रमांसाठी कंपनी भाडे घेणार असून प्रति महिना राज्य सरकारला रु. 25 लाख महसूल प्राप्त होईल, असा दावा डॉ. सावंत यांनी केला आहे.
‘विकसित गोवा 2037’ चे लक्ष्य
‘विकसित गोवा 2047’ चे लक्ष्य दहा वर्षांअगोदर म्हणजे 2037 पर्यंत साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याचे डॉ. सावंत म्हणाले. त्याचे काम कॉर्पोरेट चाणक्य सर्व्हिसकडे देण्यात आले असून ते सुरू करण्यात आले आहे. विकसित गोवा आराखडा व प्रकल्पाचे सादरीकरण मंत्रिमंडळासमोर झाले असून त्यावर तज्ञ मंडळी व जनतेकडून सूचना मागवण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. विकसित गोवा प्रकल्पाचा शुभारंभ लवकरच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अन्य विविध निर्णय
स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा खात्याच्या नियमांना मान्यता देण्यात आली आहे. होमिओपॅथीक डॉक्टरांसाठी नेंदणी सक्तीची करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने संमती दिली. शिरोडा येथील आयुर्वेद व होमिओपॅथीक महाविद्यालयांना सरकारी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. न्हावेली-सांखळी येथे किर्लोस्कर कंपनीच्या प्रकल्पासाठी जमीन देण्याचेही ठरविण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
मडगाव लैंगिक अत्याचारप्रकरणी कसून चौकशी होणार
मडगाव येथील कथित बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून मानवी तस्करी प्रकरणातून ही घटना झाली की काय? याचाही तपास होणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. या संदर्भात पोलिसांचा अहवाल झाल्यानंतर अधिक भाष्य करेन असे ते म्हणाले. बलात्कार प्रकरणातील महिला जबानी बदलत असून नवीन माहिती समोर येत असल्याने गूढ वाढत आहे. सदर महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी शब्रीश मांजरेकर यास अटक केल्याचे डॉ. सावंत यांनी निदर्शनास आणले. चौकशीतून इतरांची नावे उघड होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.









