वेगवेगळे खाद्यपदार्थ बनविणे आणि ते मनसोक्त खाणे, हा मानवाचा आवडता छंद आहे. या छंदापासून मुक्त असणारे केवळ साधूसंत आणि संन्याशीच असू शकतात. त्यामुळे नेहमी नवनव्या खाद्यपदार्थांची भर पडत राहते आणि माणसाचे जिव्हालौल्य उत्तरोत्तर वाढतच राहते. पोटाची भूक काही काळापुरती थांबते, पण जिभेची भूक कधीच कमी होत नाही. सध्या गुजरातचे शहर अहमदाबाद येथे ‘खिचडी केक’ने चांगलीच धूम माजविली आहे. येथील एक सुग्रण पूजाबेन मेहता यांनी हा अनोखा केक बनविला असून तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे.
हा केक शरिरासाठी पौष्टिक मानला जात आहे. केक असूनही त्यात मैद्याचा लवलेशही नाही. तसेच तो शुद्ध तुपात बनविला जातो. त्यामुळे त्यामुळे पचनक्रिया बिघडत नाही, असा खाणाऱ्यांचा अनुभव आहे. मैदा नसल्याने तो पचायला जड नाही. मेहता यांनी या केकची विक्रीही धडाक्यात करण्यास प्रारंभ केला आहे.
या केकमध्ये खरोखरच अनेक पदार्थांची ‘खिचडी’च असते. त्यात केक क्रंबल, चॉकलेट सॉस, वेफर बिस्किट, चॉकलेट बॉल्स, चोको चिप्स आदी पदार्थ असतात. नेहमीच्या चीज केक पेक्षा याची किंमतही कमी आहे. तो अवघ्या 100 रुपयांना मिळतो. मेहता यांनी शिक्षण संपल्यानंतर एका अन्नचाचणी प्रयोगशाळेत काम केले असल्याने त्यांना शरीराला अपायकारक अन्नपदार्थ कोणते असतात याची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांनी केक बिनविण्याच्या व्यवसायाला प्रारंभ केल्यानंतर या केकसंबंधी प्रयोग केले. ते यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्याचा व्यवसाय केला. आता या केकमुळे त्यांच्या केकशॉपची चांगलीच भरभराट झाली आहे.









