1 ऑक्टोबरपासून कार्ड पोर्टेबिलिटी सुरु होणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आता देशामध्ये ज्या प्रकारे तुम्ही तुमचा मोबाइल नंबर न बदलता एका टेलिकॉम ऑपरेटरवरून दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटरवर ट्रान्सफर करू शकता, त्याप्रमाणेच आता डेबिट आणि क्रेडिट कार्ड पोर्टेबिलिटी शक्य होणार आहे. येत्या 1 ऑक्टोबर 2023 पासून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीचे कार्ड नेटवर्क (उदा. व्हिसा, मास्टर, रुपे) निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
आरबीआयने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. यासाठी आरबीआयने 4 ऑगस्ट 2023 पर्यंत मसुद्याच्या परिपत्रकावर बँका आणि ग्राहकांकडून सूचना मागवल्या आहेत. आरबीयाने म्हटले आहे की, ‘वित्तीय संस्थांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि प्री-पेड कार्ड्स कोणत्याही विशिष्ट कार्ड नेटवर्कला जारी करू नयेत. ते लोकांना त्यांच्या आवडीचे नेटवर्क निवडण्याचा पर्याय देणार आहेत.
कार्ड पोर्टेबिलिटीची गरज का आहे?
सध्या भारतात 5 कार्ड नेटवर्क कंपन्या आहेत -व्हिसा, मास्टरकार्ड, रुपे, अमेरिकन एक्सप्रेस आणि डिनर क्लब या कंपन्यांचे विविध वित्तीय संस्थांशी टाय-अप आहेत. यामुळे ग्राहकाला त्याच्या आवडीचे कार्ड नेटवर्क निवडण्याचा पर्याय मिळत नाही.









