रत्नागिरी :
गेल्या 2 वर्षांची आकडेवारी लक्षात घेता गेल्या 8 महिन्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी पोलीस दल सकारात्मक व परिणामकारक पावले उचलणार आहे. यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचा निर्णय घेतला आल्याची घोषणा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केली. त्यामुळे आत्महत्येचा विचार मनात आलेल्या लोकांसाठी तात्काळ दिलासादायक पाऊले उचलणे शक्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- ज्येष्ठ नागरिकांची लवकरच बैठक
वाढत्या आत्महत्यांच्या घटनांबद्दल तरुण भारत संवाद मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बगाटे म्हणाले, आत्महत्यांचे प्रमाण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यामध्ये मोठे आहे. हे प्रमाण कमी होण्यासाठी सर्व स्तरामधून प्रयत्न झाले पाहिजेत. समाजातील विविध घटक या प्रश्नाशी संबंधित असून त्या सर्वांनी यासाठी कार्यरत होणे गरजेचे आहे. आत्महत्येच्या मुद्यावर काय करणे शक्य आहे यासाठी वरिष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही लवकरच एक बैठक बोलावणार आहोत. या बैठकीतून येणाऱ्या सूचना आम्ही लक्षात घेऊ आणि आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना तयार करु.
आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यांच्यावर उपचार होतात आणि नंतर सोडून देण्यात येते. आत्महत्येचा प्रयत्न करणारा प्रत्येक जण मानसोपचार तज्ञांकडे गेला पाहिजे. आपल्या अडीअडचणी डॉक्टरांना सांगितल्या पाहिजे आणि वैद्यकीय उपचाराची मदत घेतली पाहिजे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने मानसोपचार घ्यावे म्हणून पोलीसदल प्रयत्नशील राहील, असे बगाटे यांनी सांगितले.
ते म्हणाले, सायबर यंत्रणा कार्यरत असते, काही लोक गरजेप्रमाणे त्याचा लाभ घेत असतात. या सायबर व्यवस्थेतून काही सूचना मिळू शकतात. या सूचनांची दखल घेऊन आत्महत्येच्या विचार करणाऱ्या लोकांना मदत करणे शक्य होईल. कोणत्याही परिस्थितील आत्महत्या करून जीव जाता नये म्हणून पोलिसांचे प्रतिसाद दल लक्षपूर्वक प्रयत्न करेल.
आत्महत्या हा मुद्दा गंभीर आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात काम झाले पाहिजे. वि विध घटकांनी पुढे येऊन या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पुढे यायला हवे. पोलीस आपल्या परीने या प्रश्नासाठी काम करतील आणि मदतीसाठी काही रचना उभी केली जाईल, असे बगाटे शेवटी म्हणाले.








