ऐतिहासिक संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या नावाला धक्का नको
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्र चौक ते गणपत गल्ली क्रॉसपर्यंतचा खडेबाजार रोडचे नानाशंकर शेठ मार्ग असे नामकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी स्थानिकांसह व्यापाऱ्यांकडून लेखी मते घेतली जात असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. तसे झाल्यास सीमाप्रश्नाचा केंद्रबिंदू असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या नावाला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकाला फार मोठा इतिहास आहे. बेळगावच्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला या चौकातूनच सुरूवात झाल्याने त्यावेळी या चौकाला संयुक्त महाराष्ट्र चौक असे नाव देण्यात आले. तेथील मारूती मंदिर ते गणपती गल्ली क्रॉस (पोतदार ज्वेलर्स) खडेबाजार रोड म्हणून ओळखले जाते.पण आता या रस्त्याचे नानाशंकर शेठ मार्ग असे नामकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नानाशंकर शेठ हे 19 व्या शतकातील भारतातील एक प्रख्यात समाजसुधारक होते. त्यामुळे खडेबाजार रोडला त्यांचे नाव देण्यासंदर्भात 1968 मध्ये बेळगाव मनपात ठराव झाल्याचे बोलले जात आहे.
पण त्या नामकरण्याच्या ठरावाची अंमलबजावणी झाली नसल्याने आता त्या जुन्या ठरावाची कागदपत्रे काहींकडे उपलब्ध झाली आहेत. त्यानुसार नामकरणासाठी पाठपुरावा केला जात आहे. यासाठी खडेबाजार रोडवरील व्यापारी आणि रहिवाशांकडूनही तशी लेखी मते घेतली जात आहेत. या नावाला कोणाचा आक्षेप नसल्यास खडेबाजार रोडला नानाशंकर शेठ असे नाव देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा नामफलक देखील गल्लीत उभारला जाणार आहे. संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारूती मंदीर ते गणपत गल्ली क्रॉसपर्यंत आताच्या खडेबाजार रोडला नानाशंकर शेठ असे नाव देण्यास लोकांनी संमती दिली तर यामुळे संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या नावाला कोणताही धक्का पोहचणार नाही याचाही गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. कारण संयुक्त महाराष्ट्र चौक आणि मराठी माणूस यांचे भावनीक नाते आहे. नानाशंकर शेठ मार्ग नामकरणासंदर्भात यापूर्वीच मनपाकडे कागदपत्रे सादर करण्यात आली असून याबाबत मनपा बैठकीतही चर्चा करण्याची तयारी करण्यात आली आहे.
लोकांची मते आजमावणार
नामकरणाबाबत पुन्हा एकदा स्थानिकांची मते आजमावली जाणार आहेत. सर्वांनी लेखी सहमती दिल्यास तसेच कोणीही आक्षेप न घेतल्यास नामकरणावर शिक्कामोर्तब करून फलक उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. यावेळी संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या नावाला कोणताही धोका पोहचणार नाही याची खात्री करून घेणे जरूरीचे आहे.









