चीनच्या बिजिंगपासून अनेक शहरांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा फैलाव झाल्यानंतर तिथे दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत अमर्याद होणारी वाढ तसेच या खतरनाक महामारीपासून दगावणाऱयांचा आकडा लक्षणीय आणि तेवढाच भयावह आहे. संपूर्ण जगाबरोबरच भारताला देखील चिंता वाढविणारा ठरला आहे. वुहान येथून 2019 मध्ये बाहेर पडलेल्या कोविड-19 या नावाने ओळखल्या जाणाऱया या संसर्गजन्य महामारीमुळे याअगोदर चीनमध्ये फार गंभीर परिणाम झाला नव्हता. मात्र तो जगात सर्वत्र पसरला आणि भारतातही तो पसरला. भारतात या महामारीने उच्छाद माजविला होता. भारताने कितीतरी लाख माणसे या महामारीने गमावली. 2022मध्ये या महामारीची तीव्रता मंदावली आणि हळूहळू कारभार पूर्वपदावर येतो आहे, तोच चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. कित्येक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हजारो नागरिक दररोज इस्पितळात भरती होत आहेत. कितीतरी हजार लोक मरण पावत आहेत. चीनमधील एका खासगी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये सध्या पसरलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे लाखो माणसे गतप्राण होतील. आणखी पंधरा दिवसांनंतर आणखी एक लाट चीनमध्ये धुमाकूळ घालणार असल्याचा त्यांचा दावा आहे. भारतात चीनच्या या नव्या महामारीचे जंतू पोहोचू नये, यासाठी भारत सरकारने प्रयत्न केलेले आहेत. तरीदेखील काही रुग्ण येतानाच ही महामारी घेऊन भारतात परतत असल्याने, भारतासाठी अत्यंत धोक्याची ही बाब ठरते आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱया लाटेमध्ये मरणाऱयांची संख्या जास्त होती. आता नव्याने कोरोनाची जी जात निर्माण झालेली आहे, त्यातून संसर्गजन्य जास्त तापदायक आणि त्रासदायक तर आहेच. शिवाय रुग्ण दगावण्याचे प्रमाणही जास्त आहे. चीनमध्ये सध्या आहे तो. आमच्यावर फारसा फरक पडत नाही, असे म्हणून सोडून देण्यासारखा हा प्रकार नाही. कोरोनाच्या पहिल्या फेरीत रुग्णांची दगावण्याची संख्या मर्यादित होती. दुसऱया लाटेवेळी फार गंभीरपणे काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे दगावणाऱया रुग्णांची संख्या ही अनेक पटीने वाढली आणि देशात जणू हाहाकारच माजला. अति आत्मविश्वास भारतीयांना नडला. आता जो नवा व्हेरियंट सध्या चीनमध्ये धुमाकूळ घालत आहे, तो अतिभयानक असल्याने भारताने आता कडकपणे सावध पावले उचलणे तेवढेच आवश्यक आहे. कोरोनामुळे देशातील असंख्य उद्योगधंदे बंद होते. अनेकांचे रोजगार गेले. कित्येकजण आपले सगे-सोयरे गमावून बसले. आता पुन्हा असला प्रकार या देशात होऊ नये, यासाठीच भारत सरकारने त्याचबरोबर देशातील सर्व राज्य सरकारांनी आतापासून कोविडच्या नव्या व्हेरियंटचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज राहावे. आता जर गाफील राहिलो तर पुन्हा देशात प्रेतांची संख्या वाढून अराजक माजेल. देश आज जागतिक पातळीवर आयुर्वेदाची सर्वाधिक निर्मिती करणारा आहे. जगाला आयुर्वेदाच्या माध्यमातून भारताने संजीवनीच प्राप्त करून दिलेली आहे. कोविडवर जी लस तयार करण्यात आली, ती देखील भारतातच तयार झाली. भारताकडे शक्ती, बुद्धी आणि नीती देखील आहे. कोविडमुळे देशात लाखो माणसे दगावली खरी! कोटय़वधी माणसे केवळ आयुर्वेदाचा उपचार घेऊन बचावली. केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक राष्ट्रांनी भारतातून आयुर्वेदिक उत्पादने तसेच औषधे घेऊन आपापल्या देशातील नागरिकांना देऊन आपले प्राण वाचविले होते. जगाला आयुर्वेदाचे महत्त्व हे कोरोनाच्या काळात समजून चुकले. वुहानमधून कोरोनाचा प्रवास सुरू झाला. चीनमध्ये सुरुवातीला हा कोरोना पसरला व चीनची अनेक शहरे धडाधड बंद पडली. अवघ्या वर्षभरातच भारतामध्ये देखील या कोरोनाने धुमाकूळ घातला. देशातील जनतेने सुरुवातीपासूनच सतर्कता बाळगली असती तर भारतामध्ये देखील हजारो माणसांचे प्राण किंबहुना वाचले असते. चीनमध्ये सध्या कोरोनाचा जो व्हेरियंट भयाण परिस्थिती निर्माण करीत आहे, तो केवळ चीनपुरतीच मर्यादित नाही. इतर देशांमध्ये देखील या नव्या जातीने चंचूप्रवेश केलेला आहे. जपान, अमेरिकासारख्या राष्ट्रांमध्ये देखील कोरोना सध्या हैदोस माजवित आहे. भारतीय नागरिकांची प्रतिकारशक्ती काही कमी नाही. कोरोनाला हाकलायचे असेल तर त्यावर असलेली लस म्हणजेच अंतिम उपचार नव्हे. कोरोनाच्या लागणीचा फार प्रभाव आपल्या शरीरावर पडू नये, यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण करणारी ती लस आहे. कोरोनावर जालीम उपाय म्हणजे प्रतिकारशक्ती निर्माण करणे, हाच आहे. आपल्या आयुर्वेदामध्ये त्यावर अनेक मात्रा सांगितलेल्या आहेत. त्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करतात. भारतातील असंख्य इस्पितळांमध्ये कोरोनाच्या काळात मोठय़ा संख्येने माणसे मरण पावली कारण कित्येकजण डॉक्टरांच्या उपायांना प्रतिसाद देऊ शकली नाहीत. कित्येकांना औषधेच तापदायक ठरली व कित्येकजण कोरोनाच्या भितीनेच दगावली होती. एकदा का ही नवी लाट या देशात पसरली तर परिस्थिती अत्यंत बिकट होऊन जाईल. यासाठीच भारतीयांनी आतापासून प्रतिकारशक्ती वाढवावी. त्याचबरोबर कोविडचे नवे नियमही पाळणे आवश्यक आहेत. अन्यथा मागची लाट परवडली, असे म्हणण्याची वेळ येऊ शकते. कोविड-19चा शोध चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत लागला की लावला गेला, याचे रहस्य अद्याप उलगडलेले नाही मात्र चीनमधून बाहेर पडलेल्या या जंतूने संपूर्ण जगात हैदोस माजविला आणि चीन मात्र स्वस्थ. सारे जग अस्वस्थ. मात्र त्यांनी निर्माण केलेला हा भस्मासुर आता चीनवरच उलटलेला आहे. चीनमधील अनेक इस्पितळांच्या खाटा या रुग्णांनी नव्हे तर प्रेतांनी भरलेल्या आहेत, असे चित्र काही वृत्तवाहिन्यांनी दाखविले आहे. यातील सत्यसत्यता पडताळून पाहण्याची आवश्यकता असली तरीदेखील चीनने वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न केलेला आहे. नव्या जातीच्या कोरोनामुळे चीनसारख्या प्रगत राष्ट्राला जर एवढा त्रास होतो आहे तर भारतात जर का हा नवा जंतू पोहोचला तर भारताची काय अवस्था होईल? त्यामुळेच भारताने आतापासून खबरदारीचे उपाय आखणे आवश्यक आहे. सध्या भारताने चीनमधून येणाऱया विमानांवर निर्बंध लागू केलेले आहेत मात्र चीनकडून भारताला नेहमीच धोका संभवत असल्याने चीनमधील कोरोनाची नव्या जातीची लाट पोहोचविण्यासाठी ‘ड्रगन’ अन्य कोणतेही पाऊल उचलण्याची वा इतर राष्ट्रांमार्गे भारतात पोहोचविण्याची व्यवस्था करू शकतो. तेव्हा सर्वांनीच सावध राहणे आवश्यक आहे. कोरोनाची नवी जात अत्यंत घातक आहे व या जातीचा प्रसार करणारा देश किती घातक असेल, याचा विचार केल्यास सावध राहून कडक उपाययोजना हाती घेणे, हाच खरेतर पर्याय ठरू शकतो.
Previous Articleऑस्ट्रेलियाची कसोटी मालिकेत विजयी आघाडी
Next Article न्यूझीलंड वनडे संघांची घोषणा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








