सेंट्रल ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनची परवानगी
बेळगाव : सांबरा येथील बेळगाव विमानतळाचा विकास सुरू आहे. त्यातच आता विमानांच्या पार्किंगची क्षमता वाढविण्यात आल्याने भविष्यात विमानसेवा विस्तारण्याची शक्यता आहे. आता विमानतळावर एकाचवेळी 12 विमाने पार्किंग करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी विमानसेवा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेळगाव विमानतळावर यापूर्वी केवळ दोन ते तीन विमानांची पार्किंग क्षमता होती. नाईट लँडींगच्या सुविधेमुळे रात्रीच्यावेळी विमानांची ये-जा करणे शक्य झाले. स्टार एअरची विमाने रात्रीच्यावेळी पार्किंगसाठी बेळगावमध्ये येऊ लागली. विमानतळाची क्षमता असतानाही परवानगीअभावी पार्किंगची क्षमता वाढत नव्हती. नुकतीच सेंट्रल ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरीटीच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाला भेट देऊन पार्किंगच्या जागेची पाहणी केली. सुरक्षितरित्या बेळगावमध्ये पार्किंग होऊ शकते, असा रिपोर्ट त्यांनी दिल्यानंतर पार्किंगची क्षमता वाढविण्यात आली आहे. विमानांच्या पार्किंगची क्षमता वाढविल्यामुळे सुरक्षेतही वाढ करावी लागणार आहे. यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांची बैठक घेतली जाणार आहे.
सुरक्षा यंत्रणांची पाहणी केल्यानंतर पार्किंगची क्षमता वाढविली
विमानतळावरील पार्किंगची क्षमता वाढविण्याची मागणी होत होती. नुकतीच दिल्ली येथील सेंट्रल ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरीटीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. येथील सुरक्षा यंत्रणांची पाहणी केल्यानंतर पार्किंगची क्षमता वाढविण्यात आली आहे. यापुढे एकाचवेळी 12 विमानांचे पार्किंग करण्याची परवानगी विमानतळाला मिळाली आहे.
– त्यागराजन (विमानतळ संचालक)









