वृत्तसंस्था/ माँटे कार्लो
जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचला येथे सुरू असलेल्या माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत दुसऱया फेरीतच पराभवाचा धक्का बसला. या मोसमातील त्याचा हा केवळ चौथा सामना होता.
बिगरमानांकित स्पेनच्या अलेजांड्रो डेव्हिडोविच फोकिनाने जोकोविचवर 6-3, 6-7 (5-7), 6-1 अशी मात केली. 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱया जोकोविचला या वर्षाच्या सुरुवातीलाच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागले. कोव्हिड 19 चे व्हॅक्सिनेशन झाले नसल्याने त्याला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेवेळी पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि नंतर त्याला मायदेशी परतावे लागल्याने ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद त्याला राखण्याची संधी मिळाली नव्हती. मोनॅकोमधील मास्टर्स 1000 स्पर्धेआधी त्याने दुबईत केवळ तीन सामने खेळले होते. त्याला येथील लढतीत अपेक्षित सूर गवसला नाही. स्पेनच्या फोकिनाने पहिल्या सेटमध्ये 4-1 अशी आघाडी घेत नंतर हा सेटही जिंकला. दुसऱया सेटमध्येही त्याने 3-0 अशी आघाडी घेतली होती. पण जोकोविचने मुसंडी मारत हा सेट टायब्रेकरवर नेला आणि तेथे हा सेट जिंकून बरोबरी साधली. पण निर्णायक सेटमध्ये फोकिनाने आपला खेळ उंचावला आणि जोकोविचला फारशी संधी न देता 6-1 असा सेट घेत विजय मिळविला.









