एनआयएला मोठे यश : नेपाळमधून अटकेत : 15 वर्षांपासून होता वाँटेड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कुख्यात नक्षली नेता आणि पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएलएफआय) प्रमुख दिनेश गोप आता सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात आहे. दिनेश गोप विरोधात झारखंड सरकारने 25 लाख तर एनआयएने 5 लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.
मागील 15 वर्षांपासून देशाच्या यंत्रणा, पोलीस आणि सीआरपीएफकरता दिनेश गोप वाँटेड होता. दिनेश गोप झारखंडमध्ये अनेक वर्षांपासून नक्षली कारवायांमध्ये सक्रीय होता. नक्षली म्होरक्यावर 100 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. दिनेश गोप जेरबंद झाला असला तरीही त्याचे अनेक साथीदार अद्याप फरार आहेत.
पीएलएफआय प्रमुख दिनेश गोपला अटक होणे सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे यश आहे. या नक्षलवाद्याची कसून चौकशी केली जात आहे. दिनेश गोप दीर्घकाळापासून नेपाळमध्ये लपून बसला होता. केंद्रीय यंत्रणांसोबत दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने दिनेश गोपला जेरबंद करण्याच्या मोहिमेत भाग घेतला होता.
दिनेश गोप वेशांतर करून नेपाळमध्ये लपून असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. दिनेश गोपने तेथे शीखधर्मीयाचा वेश धारण केला होता. दिनेश नेपाळच्या काठमांडूमध्ये लपला असल्याचे इनपूट दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाले होते. यानंतर एनआयएसोबत मिळून त्याला जेरबंद करण्याची मोहीम पार पाडण्यात आली आहे.
दिनेश गोपने एके 47 सारख्या शस्त्रास्त्रांचा वापर करत अनेक गुन्हे केले आहेत. झारखंड पोलिसांनी त्याची पोस्टर्स झळकविली होती. पीएलएफआय प्रमुख गोपसाठी पाकिस्तान, चीन, बेल्जियम आणि स्कॉटलंडमधून शस्त्रास्त्रs पोहोचत होती असे तपासात आढळून आले आहे.









