सांगली :
गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड म्हमद्या उर्फ महम्मद जमाल नदाफ टोळीतील आणखी एका साथीदारास जेरबंद केले. जमीर रहिमान नदाफ (३७, रा. बेघर वसाहत, दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो पसार होता. शहरालगत असणाऱ्या धामणी फाट्यावर सापळा रचून शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई केली. नदाफ याच्यासह पाच जणांना यापुर्वी अटक करण्यात आली होती.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की संशयित पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे दोघे म्हमद्याच्या टोळीतील साथीदार आहेत. दोघांमधील आर्थिक कारणावरुन तसेच जखमी सलीम मुजावर याचे अजय माने समवेत असलेल्या संबंधाच्या कारणातून संशयित तिघांनी सलीम यास जीवे मारण्याचा कट रचला. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी म्हमद्या नदाफ, इम्रान दानवडे आणि पप्पू फाकडे असे तिघे शंभर फुटी रस्त्यावरील सर्वधर्म चौकात गेले. सलीम मुजावर यास संशयित फारुक करुन नदाफने फोन घराबाहेर बोलावले. बाहेर येताच आधीपासून तयारीत असणाऱ्या म्हमद्याने पिस्तूल काढून सलीमच्या छातीच्या उजव्या बाजूस बरगडीजवळ गोळीबार केला. यात सलीम गंभीर जखमी झाला. त्यानंतर संशयितांना अटक केली होती. जमीर नदाफ याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले. तो चार महिन्यांपासून पसार होता. अखेर तो आज सकाळी धामणी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हा प्रकटीकरणला मिळाली. त्यानुसार सापळा रचून ताब्यात घेतले. सहायक अधीक्षक विमला एम., निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.
संशयित समीर नदाफचा मिरजेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या हॉटेल तोडफोडीत सहभाग असल्याचे समोर आले. त्या गुन्ह्यातही ताब्यात घेतले जाणार आहे.








