एपीएमसी पोलिसांना न्यायालयाने बजावले आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
जमिनीच्या व्यवहारामध्ये तुम्ही अधिक पैसे घेतला म्हणून मध्यस्थीलाच धमकी देणे, असे प्रकार करण्यात आले होते. याप्रकरणी त्या सामान्य नागरिकाने पोलीस आयुक्तांसह राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे निवेदन पाठविले होते. तरीदेखील धमकी देणाऱ्यांवर एपीएमसी पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेण्यात आली. न्यायालयाने एपीएमसी पोलिसांना याप्रकरणाची चौकशी करून अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
नारायण मारुती ताशिलदार (वय 67, रा. सदाशिवनगर) यांना जगन्नाथ शट्टुप्पा सूर्यवंशी, साधना सूर्यवंशी, अमरजा सूर्यवंशी, अलोक जगन्नाथ सूर्यवंशी (सर्व रा. कनकदास सर्कल, महांतेशनगर), प्रवीण सुंडीकर, अश्विनी सुंडीकर (रा. संभाजीनगर, वडगाव), पूनम विनायक गिरी (रा. महांतेशनगर), अनुजा गिरी (रा. एस. व्ही. कॉलनी, टिळकवाडी), अजित पाटील (रा. निलजी) हे सर्वजण त्रास देत होते.
जगन्नाथ सूर्यवंशी यांनी मन्सूरअली मुल्ला यांना जमीन विकली होती. यामध्ये नारायण ताशिलदार हे मध्यस्थी होते. जगन्नाथ सूर्यवंशी आणि मन्सूरअली यांच्यामध्ये व्यवहार झाला. जगन्नाथ सूर्यवंशी यांनी पूर्ण रक्कम घेतली. मात्र ही रक्कम नारायण ताशिलदार यांनीच घेतली, ती रक्कम आम्हाला दे म्हणून त्यांना तगादा लावला. मात्र याच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे सांगितले तरी दमदाटी, धमकी देणे, मानसिक त्रास सुरू होते. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने ताशिलदार यांची बाजू ऐकून घेतली. फिर्यादीच्यावतीने अॅड. जे. वाय. पाटील यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेऊन एपीएमसी पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कलम 108, 306, 504, 506 सहकलम 34 अन्वये तसेच 156(3) प्रकारे चौकशी करून अहवाल सादर करावा, असा आदेश बजावला आहे.








