हरकती, सूचनांसाठी 15 दिवसांची मुदत : नियम-अटींमुळे टॅक्सीचालक संभ्रमात
पणजी : मोपा – पेडणे येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ब्ल्यू पॅब काऊंटर व टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी वाहतूक खात्याने अधिसूचना जारी केली असून त्यावर येत्या 15 दिवसांत सूचना, हरकती मागवल्या आहेत. त्यासाठीचे नियम व अटी यांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. त्यातील नियमानुसार ब्ल्यू पॅबसाठी अर्ज करणाऱ्याने समुपदेशन प्रशिक्षण स्वत:च्या खर्चाने पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. पीएसव्ही बॅचधारकाने त्याकरीता प्रशिक्षण घ्यावे. टॅक्सी निळ्dया रंगाने रंगवावी असेही सूचित करण्यात आले आहे. मोपा विमानतळ चालवणाऱ्या जीएमआर या कंपनीतर्फे त्या ब्ल्यू टॅक्सींना पार्किंग जागा व सेवा रस्ता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तेथील टॅक्सी काऊंटरचा गेले अनेक महिने प्रलंबित असलेला विषय मार्गी लागणार, अशी चिन्हे दिसत आहेत. हे नियम जरी करण्यात आले असले तरी समुपदेशन प्रशिक्षण कुठे घ्यावे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यासाठी किती खर्च होणार याचाही पत्ता नाही. त्यामुळे सदर अधिसूचना पुन्हा एकदा संबंधितांना संभ्रमात टाकणारी असल्याचे समोर आले आहे. मोपा विमानतळ सुरू होऊन सुमारे 5 महिने झाले असले तरी तेथील टॅक्सी काऊंटरचा विषय सुटत नाही हे एक प्रकारे सरकारचे अपयशच असल्याची टीका करण्यात येत आहे.









