पोलिसांकडून दबावतंत्र : मराठी भाषिकांत संताप
बेळगाव : काळादिनाच्या सायकल फेरीला सर्वस्तरातून पाठिंबा मिळू लागल्याने कर्नाटक पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर सुरू करण्यात आला आहे. म. ए. समितीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांकडून खबरदारीची नोटीस बजावली आहे. शांततेच्या मार्गाने काळादिनाची सायकल फेरी काढली जात असतानाही पोलिसांकडून नोटिसीद्वारे आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीने धर्मवीर संभाजी उद्यानापासून 2023, तसेच 2024 मध्ये सायकल फेरी काढली होती. अशा फेरीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, असे कारण देत पोलिसांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी 5 लाखांची वैयक्तिक हमी व तितक्याच रकमेचा जामीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मार्केट पोलीस स्थानकाच्या निरीक्षकांनी ही नोटीस बजावली आहे.
मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांना नोटिसा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सोमवारी मध्यवर्ती समितीच्या या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन शांततेत सायकल फेरी काढण्यासंदर्भात चर्चा केली होती आणि काही वेळातच त्यांना या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे कितीही दबाव आणला तरी सीमालढा सुरू ठेवला जाणारच, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.









