अस्वच्छता दिसून आल्यास परवाना होणार रद्द : कॅन्टोन्मेंट बोर्डने उघडली मोहीम
बेळगाव : हॉटेलमधील अस्वच्छता, सडलेल्या भाज्यांचा वापर, अनेक दिवस फ्रिजमध्ये ठेवलेले चिकन, मटण वापरामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. याविरोधात कॅन्टोन्मेंट बोर्डने एक मोहीम उघडली असून अस्वच्छता असलेल्या हॉटेल व्यावसायिक, बेकरी चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. बोर्डने तपासणीअंती एक यादी तयार केली असून त्यांना काही दिवसांचा वेळ दिला आहे. यानंतरही अस्वच्छता अशीच दिसल्यास कायमस्वरुपी परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड अंतर्गत मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्टेशन येत असल्याने या परिसरात अनेक हॉटेल्स, फूड स्टॉल, बेकरी व्यावसायिक आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या स्वच्छता निरीक्षकांकडून या हॉटेल्सची वारंवार तपासणी होते. शहरातील नामांकित बेकरी, तसेच हॉटेलमध्ये अस्वच्छता, झुरळ आणि पालींचा वावर, सडलेल्या भाज्यांचा वापर सुरू असल्याचे चित्र दिसून आल्याने कॅन्टोन्मेंटने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दोन महिन्यांपूर्वी काही बेकरी चालकांना नोटिसाही देण्यात आल्या होत्या.
खासदारांनी व्यक्त केली नाराजी
निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची शहरात विक्री होत असल्याने खासदार जगदीश शेट्टर यांनी नाराजी व्यक्त केली. खाद्यपदार्थांच्या नावाखाली सुमार दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी संताप व्यक्त केला. कॅन्टोन्मेंटने एक अहवाल छायाचित्रांनिशी तयार केला असून यामध्ये हॉटेल व बेकरीच्या किचनमध्ये झुरळ, उंदीर, सडलेला भाजीपाला, अनेक दिवसांचे चिकन दिसून आले आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांना एक संधी देण्यात आली असून यापुढेही असेच प्रकार सुरू राहिल्यास दुकानांना टाळे घालण्याचा इशारा देण्यात आला.
विक्रेत्यांना आता दिवसाला 100 रुपये भाडे द्यावे लागणार
कॅन्टोन्मेंटमधील विक्रेत्यांना यापूर्वी दिवसाला 50 रुपये भाडे द्यावे लागत होते. आता दिवसाला 100 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. भेलपुरी, पावभाजी, फूड्स स्टॉल, चायनीज स्टॉल यासह फिरत्या फूड स्टॉलना ही दरवाढ करण्यात आली आहे. काही हॉटेल व्यावसायिकांनी परवाना नूतनीकरण केलेला नसून त्यांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत.









