बेकायदेशीर घरांच्या पाहणीनंतर दवर्ली दिकरपाल पंचायतीची कृती
प्रतिनिधी/ मडगाव
दवर्ली दिकरपाल पंचायतीकडून भगवती, दवर्ली परिसरातील बेकायदा घरांची पाहणी करण्यात आल्यानंतर त्यापैकी 47 बेकायदेशीर घरांना जमीनदोस्त करण्यासंदर्भात नुकत्याच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पाहणीनंतर ज्या घरांची कागदपत्रे योग्य नव्हती व अवैधरीत्या उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे अशांना या नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचे सरपंच हर्क्युलान नियासो यांनी सांगितले आहे.
दवर्ली दिकरपाल पंचायतीला भगवती परिसरात बेकायदेशीररीत्या घरे बांधण्यात आल्याची तक्रार पंचायतीकडे आली होती. त्यानुसार सरपंच नियासो यांनी या नोटिसा जारी केल्या आहेत. सदर परिसरातील ही घरे बेकायदा म्हणण्यात येत असली, तरी सुमारे 15 वर्षांपासून ही घरे अस्तित्वात आहेत. याआधी या बेकायदा घरांबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. मात्र, पंचायतीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर ही पाहणी करण्यात आली. ही पाहणी केवळ पंचायतीच्या माहितीसाठी असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
इतकी वर्षे वास्तव्य करून असतानाही या घरांनी मालकी आपल्या नावावर दाखवली नसल्याचे पंचायतीच्या लक्षात आले होते. मागील फेब्रुवारी महिन्यात ही पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी काही घरमालकांनी कागदपत्रे दाखवण्यास तसेच घरांचे मोजमाप करण्यास विरोध दर्शवला होता. काही घरांच्या मालकी हक्काची प्रकरणे उच्च न्यायालयात असल्याचेही पंचायतीच्या निदर्शनास आले आहे. एकूण 47 घरांबाबत तक्रार दाखल झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदा घरांना नोटिसा प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या नोटिसांच्या विरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.









