अखेर म. ए. समिती नगरसेवकांच्या मागणीला यश : नोटीसही आगाऊ देण्याची महानगरपालिकेकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस आणि विषयपत्रिका मराठीतून देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांतून केली जात होती. शनिवारच्या बैठकीची नोटीसही केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेतून देण्यात आल्याने याबाबत नगरसेवक रवी साळुंखे व त्यांचे सहकारी बैठकीत आवाज उठविणार होते. मात्र बैठकीवेळी सभागृहात नगरसेवकांना मराठी भाषेतील सभेची नोटीस व विषयपत्रिका वितरित करण्यात आली. यामुळे नगरसेवक रवी साळुंखे यांनी महापौरांचे आभार मानले. पण अजेंड्याबरोबरच यापुढे नोटीसदेखील आगाऊ देण्यात यावी, अशी मागणी केली. एकंदरीत म. ए. समितीच्या नगरसेवकांची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर शनिवारची सर्वसाधारण बैठक दुपारनंतर मराठीतच चालली.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस कन्नडबरोबरच मराठी भाषेतून देण्यात यावी, अशी मागणी म. ए. समितीच्या नगरसेवकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मध्यंतरी कन्नडबरोबरच अनुवाद केलेली मराठी भाषेतील नोटीस नगरसेवकांना दिली जात होती. मात्र अलीकडे भाषांतरकार नसल्याचे कारण सांगत मराठी भाषेतून नोटीस देण्याचे टाळण्यात आले होते. कन्नडमधून देण्यात येणारी नोटीस व विषयपत्रिका आपल्याला समजत नसल्याने मराठी भाषेतून नोटीस देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे व मराठी नगरसेवक करत होते. पण त्यांना भाषांतरकार नसल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली जात होती.
शनिवारच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीसही केवळ कन्नड व इंग्रजी भाषेत देण्यात आली होती. त्यामुळे याबाबत बैठकीत आवाज उठवून अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय समिती नगरसेवकांनी घेतला होता. मात्र महापौर व मनपा अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेत मराठी भाषेतील नोटीस व विषयपत्रिका सभागृहात नगरसेवकांना उपलब्ध करून दिली. याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी समाधान व्यक्त करत महापौरांचे अभिनंदन केले. मात्र सभागृहात मराठी भाषेतील नोटीस उपलब्ध करून देण्याऐवजी अजेंड्यासोबत आगाऊ नोटीस देण्यात यावी, अशी मागणी केली.
आगाऊ नोटीस देण्याचे आश्वासन
महापौर मंगेश पवार यांनी यापुढे आगाऊ नोटीस देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले. एकंदरीत नोटीसही आगाऊ देण्यात यावी, अशी मागणी म. ए. समिती नगरसेवकांच्या गेल्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला यश आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.









