वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उत्तरप्रदेशचे माजी मंत्री आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला यांच्याकडून दाखल याचिकेवर उत्तरप्रदेश सरकारकडून उत्तर मागविले आहे. मशीन चोरीप्रकरणी जामीन देण्यास नकार देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्यायाधीश एम.एम. सुंदरेश आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस जारी करत उत्तर मागविले आहे.
आझम खान, अब्दुल्ला आणि अन्य पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. नगरपालिकेने खरेदी केलेले रस्ता साफ करणारे यंत्र चोरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे यंत्र तपासात रामपूर येथील जौहर विद्यापीठातून हस्तगत करण्यात आले होते. वकार अली खान नावाच्या इसमाने यासंबंधी 2022 मध्ये रामपूर येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली होती.









