शहरात कावीळचे रुग्ण आढळल्यामुळे होणार कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या शहरामध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे, अशा तक्रारी वाढल्या तरी या मागचे कारण म्हणजे दूषित पाणी तसेच उघड्यावरील पदार्थ खाल्यामुळे हे आजार होत आहेत. त्यासाठी आता शहरातील अस्वच्छ असलेल्या टपरी व हॉटेल चालकांना लवकरच स्वच्छतेबाबत नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी दिली.
सध्या अधिवेशनाचे काम सुरू आहे. त्यामुळे हॉटेलच्या तपासणीबाबतचे काम थंडावले आहे. यापूर्वी विविध ठिकाणी तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास 2 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही अस्वच्छता असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जुना पी. बी. रोड ते मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजुला हातगाड्यांवरच नाष्टा व चहा दिला जात आहे.
पिण्यासाठी ठेवण्यात आलेले पाणी हे दूषित असते. त्यामुळे कावीळचे रुग्ण वाढले आहेत, अशा तक्रारी होत आहेत. शहराच्या काही भागात कावीळचा आजार झाल्याचे रुग्ण आढळल्यामुळे महापालिकेच्यावतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा दूषित नाही तर त्या परिसरातील पाणी पिऊनच हे आजार उद्भवत आहेत, असे त्यांनी सांगितले.
रस्त्याच्या दोन्ही बाजुला टपरी चालक अशुद्ध पाणीपुरवठा करत असतात. त्यामुळेच कावीळ सारखे आजार होत आहेत. सध्या शहरामध्ये मलेरियाचे रुग्ण मात्र नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता अनेकजण कावीळ आजाराबाबत तक्रार करत आहेत. त्यामुळे संबंधित टपरी चालकांना नोटीस देण्यात येणार आहे. याचबरोबर अधिवेशन झाल्यानंतर पुन्हा तपासणी केली जाणार आहे. ज्या ठिकाणी अस्वच्छता असल्याचे आढळणार आहे त्यांच्याकडून दंड आकारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.









