25 जानेवारीपूर्वी लेखी अहवाल देण्याची सूचना
अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील मोरबी झुलता पूल दुर्घटनेप्रकरणी गुजरात सरकारने मोरबी नगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावून कर्तव्य बजावण्यात अयशस्वी झाल्याबद्दल बरखास्त का करू नये, अशी विचारणा केली आहे. त्याबाबत राज्याच्या नगरविकास विभागाने काढलेल्या या नोटिशीमध्ये 25 जानेवारीपर्यंत लेखी खुलासा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोरबी शहरातील मच्छू नदीवर बांधलेला झुलता पूल गेल्यावषी 30 ऑक्टोबर रोजी कोसळला होता. या दुर्घटनेत 135 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 40 हून अधिक मुलांचाही समावेश होता. मोरबी नगरपालिकेसोबत झालेल्या करारानुसार ओरेवा ग्रुपद्वारे या पुलाचे कामकाज पूर्ण करण्यात आले होते. हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला केल्यानंतर अवघ्या पाच दिवसातच तुटला. प्रचंड वजनाचा ताण पडल्याने पुलावर उपस्थित असलेले सुमारे 500 लोक नदीत कोसळले होते. त्यापैकी बऱयाच जणांना घटनास्थळीच प्राण गमवावा लागला होता.









