शांतादुर्गा मंदिर सभागृहात आज शिवप्रेमींची बैठक
म्हापसा : कळंगुट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा इशारा कळंगुट पंचायतीने दिल्याने पुतळ्याच्या संरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी कळंगुटसह गोव्यातील सर्व शिवप्रेमींनी आज मंगळवार 20 रोजी सकाळी 11 वाजता कळंगुटमधील श्री शांतादुर्गा मंदिराच्या सभागृहात जमावे, अशी हाक शिवस्वराज्य, कळंगुट या संस्थेतर्फे देण्यात आली आहे. एकोणीस दिवसांपुर्वी उभारण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या दहा दिवसांच्या आत हटवावा, अन्यथा कळंगुट ग्रामपंचायत स्वत: तो हटविणार आहे, अशी नोटिस कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी बजावल्याने काल सोमवारी रात्री तेथे वातावरण तंग बनले होते. सरंपच जोसेफ सिक्वेरा यांना जाब विचारण्यासाठी आज मंगळवारी 20 रोजी सकाळी 11 वा. श्री शांतादुर्गा मंदिराच्या सभागृहात संस्थेच्या सर्वांनी जमण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर गोव्यातील शिवप्रेमींनीही उपस्थित रहावे, अशी हाक शिवस्वराज्य कळंगुट संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांनी दिली आहे.
कळंगुट पोलिसस्थानकाजवळ मोठ्या उत्साहात या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी स्थानिक आमदार तसेच सरपंचाना आमंत्रण न देता हा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यावरुन राजकारण तसेच उलटसुलट चर्चा सुरु होती. यासदंर्भात दै. तरुण भारतशी बोलताना ज्ञानेश्वर मठकर म्हणाले की, आम्हाला काल सोमवारी सायंकाळी पंचायतीने नोटिस पाठवून दिली. एकोणीस दिवसांतच हा पुतळा हटविण्यामागचे नेमके कारण काय हे स्पष्ट झालेले नाही. स्वत:च्या अहंकारामुळेच जोसेफ सिक्वेरा यांनी स्वत:च्या अन्य दोन पंचांना हाताशी धरुन ही नोटिस बजावली आहे. अन्य कोणत्याही पंचाला विश्वासात घेण्यात आलेले नाही. कळंगुटमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाल्यास सरपंच, ग्रामपंचायत जबाबदार राहील, असे मठकर यावेळी म्हणाले. रात्री उशिरापर्यंत शिवस्वराज्य संस्थेचे कार्यकर्ते पुतळ्याजवळ ठाण मांडून होते.









