सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेतील एसडीए कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार एफडीए दर्जा देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. मात्र ज्येष्ठता डावलून इतरांनाच एफडीए दर्जा दिल्यामुळे एका एसडीए कर्मचाऱ्याने वकिलांमार्फत महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराच या कर्मचाऱ्याने दिला आहे. दुजाभाव केल्यामुळे त्यांना ही नोटीस पाठविण्यात आल्याचे वकिलांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेमध्ये एसडीए म्हणून गजानन आवान्ना कांबळे काम करत आहेत. साहाय्यक कार्यकारी अभियंते म्हणून त्यांनी उत्तर विभागात काम केले असताना त्यांना नियमानुसार बढती दिली पाहिजे. मात्र त्यांना बढती न देता इतरांनाच बढती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून तातडीने त्यांना बढती द्यावी, अशी नोटीस अॅड. गिरीराज एन. पाटील यांनी महापालिका आयुक्तांना दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच बढती देण्याबाबत आदेश काढला आहे. त्या आदेशानुसार अनेकांना बढती देण्यात आली. गजानन यांनी खात्यानुसार होणाऱ्या परीक्षांमध्येही उत्तम गुण मिळविले आहेत. त्यामुळे त्यांना नियमानुसार बढती दिली पाहिजे. मात्र बढती देण्यात आली नाही. त्यामुळे आता तातडीने त्यांना बढती द्यावी, अशी नोटीस देण्यात आली आहे. गजानन हे 20 महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी त्यांना नियमानुसार बढती देण्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे.









