रावण दहन प्रकरणाला वेगळे वळण
प्रतिनिधी/ पणजी
कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात झालेल्या रावण दहन प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून तुरुंग अधीक्षक गौरीश कुट्टीकर यांना तुरुंग महानिरीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अधीक्षक कुट्टीकर यांनी फटाके व रावण दहनासाठी लागणारे साहित्य कारागृहात आणण्यासाठी कायदेशीर आदेश जारी केला होता. त्या सामानाची कसून तपासणी करण्याचीही सूचना केली होती. तसेच रावणाची प्रतिमा तयार करुंन त्याचे दहन करण्यासाठी कारागृहातील काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. तसा कुट्टीकर यांनी आदेश जारी केला होता.
फटाक्यांची आतषबाजी, कारागृहात ज्वलनशील पदार्थ केरोसीन लायटर यांचा वापर करून सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेऊन तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी चार तुऊंग अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यात साहाय्यक अधीक्षक चंद्रकात हरिजन, जेलर महेश फडते, अनिल गावकर व साहाय्यक जेलर रामनाथ गावडे यांचा सहभाग होता. निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांनी तुऊंग महानिरीक्षकांसमोर काल आपले म्हणणे मांडले असता तुऊंग अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
सध्या कारागृहातील कारभार म्हणजे कारागृह सुरक्षारक्षकांची डोकेदुखी बनली आहे. कारागृहात सुरक्षारक्षकांची मोठ्या प्रमाणात उणीव आहे. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला 24 तास ड्युटी करावी लागते. एखाद्या सुरक्षारक्षकाला जेवणासाठी जायचे असल्यास त्यांनी दुसऱ्या ठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकाकडे लेखीस्वरूपात ताबा देणे आवश्यक असते. एका सुरक्षारक्षकाला दोन ठिकाणे सांभाळणे शक्य आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच काळात एखादी घटना घडल्यास त्या सुरक्षारक्षकाला जबाबदार धरले जाणार नाही काय, असा सवालही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.









