महानगरपालिका आयुक्तांची कारवाई : महापालिकेत पुन्हा खळबळ
बेळगाव : महापालिकेच्या थकीत करवसुलीत पडद्यामागून खेळ खेळणाऱ्या महसूल विभागातील चार जणांना महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आणखी एका प्रकरणात नोटीस बजावली आहे. चार दिवसांपूर्वीच आयुक्तांनी महसूल उपायुक्तांसह पाच जणांना नोटीस बजावली असतानाच पुन्हा अशाच प्रकारची नोटीस बजावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या एका नामांकित कंपनीने महापालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून वैज्ञानिकरित्या कर भरलेला नाही. करापोटी कंपनीने कोट्यावधी रुपये भरणे बाकी असल्याचे सूत्रांकडून समजते.
पण महापालिकेच्या महसूल विभागाकडून केवळ जीएसटी रक्कम भरून घेऊन कंपनीला मोठी सूट दिल्याची चर्चा आहे. त्या जीएसटी रकमेमध्ये किती जण सहभागी आहेत, याबाबत महापालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या करवसुलीत गोलमाल झाल्याची माहिती मनपा आयुक्त शुभा बी. यांना समजल्याने त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. याबाबत खुलासा देण्याची सूचना त्यांनी केली असून महसूल विभागातील चार जणांना नोटीस बजावली आहे. इतकेच नव्हे तर संबंधित कंपनीकडून महापालिकेचा थकीत कर कोणत्याही सवलतीशिवाय वसूल करावा, अशी सक्त सूचना केली आहे.
त्यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी धावपळ सुरू केली आहे.केवळ ही एकच घटना सध्या उघडकीस आली असली तरी महापालिकेच्या महसूल विभागाकडून आणखी किती घोटाळे झाले आहेत हे समोर येणे महत्त्वाचे आहे. यासाठी महापालिका आयुक्त शुभा बी. यांना भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. करवसुलीत गोलमाल झाल्याचे उघडकीस येताच महसूल शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेतील भ्रष्ट कारभार मोडीत काढण्यासाठी मनपा आयुक्तांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. अलीकडेच एका खासगी शिक्षण संस्थेला चलन देण्यास विलंब करण्यासह गैरव्यवहार झाल्याप्रकरणी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्यासह पाच जणांना नोटीस बजावून स्वत: उपस्थित राहून उत्तर द्यावे, असे निर्देश दिले होते. मात्र संबंधितांनी त्या नोटिसीला काय उत्तर दिले व आयुक्तांनीही त्यावर कोणती कारवाई केली, हे मात्र अद्याप गूढच आहे. अशा भ्रष्ट कारभाराविरोधात आयुक्तांनी कठोर कारवाई केली तरच मनपातील कारभारात सुधारणा होईल, असे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे.









