पुरकायस्थ यांच्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
न्यूजक्लिकचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ तसेच एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना झालेल्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली आहे. न्यायाधीश बी.आर. गवई आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे. प्रबीर आणि अमित यांनी स्वत:च्या अटकेच्या विरोधात 16 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने 10 ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींची 10 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. ही कोठडी 20 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येणार आहे. पुरकायस्थ आणि अमित यांच्यावर चीनशी संबंधित कंपन्या आणि संघटनांकडून फंडिंग प्राप्त करत चिनी दुष्प्रचार फैलावण्याचा आरोप आहे. या कारवाईच्या विरोधात आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आता 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. न्यूजक्लिक विरोधात सीबीआयसह 5 यंत्रणा तपास करत आहेत. सर्वप्रथम दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने एफआयआर नोंदविला होता. त्यापूर्वी दिल्ली पोलीस इकोनॉमिक ऑफेन्स विंग, ईडी आणि प्राप्तिकर विभाग याच्याशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये तपास करत होते. सीबीआयने न्यूजक्लिक विरोधात एफसीआरए अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.









