नवी दिल्ली
\जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदकडून युएपीएच्या विविध तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. न्यायालय आता याप्रकरणी 22 नोव्हेंबर रोजी सुनावणी करणार आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्ली दंगलीच्या मागील कटात सहभागावरून युएपीए अंतर्गत नोंद गुन्ह्याप्रकरणी जामिनाची मागणी करणाऱ्या खालिदच्या याचिकेवरही त्याच दिवशी सुनावणी करणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. उमर खालिद, शरजील इमाम समवेत आणखी काही जणांवर दिल्ली दंगलीचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. दिल्ली दंगलीत 53 जण मारले गेले होते तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते.









