निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची वाजवी दरात विक्री : अन्न सुरक्षा प्राधिकारकडून कारवाई
बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकामध्ये परवानगी नसताना बेकायदेशीरपणे व्यवसाय थाटलेल्या दुकानदारांवर अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकारच्या अधिकाऱ्यांकडून छापा टाकून निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री करण्यात येत असल्याप्रकरणी नोटीस जारी करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्री करण्यात येत आहेत. याबरोबरच एमआरपीपेक्षा अधिक दराने पदार्थांची विक्री केली जात होती. याबाबत ग्राहकांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अचानक छापा टाकून दुकानांची तपासणी करण्यात आली. दुकानदारांनी अन्न सुरक्षा प्राधिकारकडून परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. यावरून दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. व्यापार करण्यास परिवहन मंडळाने परवानगी दिल्याच्या कारणावरून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानकामध्ये बेकायदेशीरपणे दुकाने थाटण्यात आली आहेत. यामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम झाला आहे. लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबरोबरच निकृष्ट दर्जाचे पदार्थ अधिक दराने विक्री केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. याबरोबरच सरकारला द्यावा लागणारा कर भरून अन्न सुरक्षा प्राधिकारची परवानगी घेणे सक्तीचे आहे, अशी सूचना नोटिसीद्वारे करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करणार
मध्यवर्ती बसस्थानकामध्ये प्रवाशांसह ग्राहकांना निकृष्ट दर्जाच्या पदार्थांची विक्री केली जात होती. एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री करत असल्याची तक्रार केली होती. यावरून सदर व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
– जिल्हाधिकारी नितेश पाटील









