वृत्तसंस्था /नवी दिल्ली
विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचा इशारा मिळाल्यानंतर केंद्र सरकारने आता मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करत अॅपल कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयटी) मंत्रालयाने यासंदर्भात आयफोन उत्पादक कंपनी अॅपलला नोटीस बजावली आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या प्रकरणाची चौकशी करत असून अॅपलला नोटीस पाठवण्यात आल्याचे आयटी सचिव एस कृष्णन यांनी सांगितले. 31 ऑक्टोबर रोजी अनेक विरोधी नेत्यांनी आपल्याला अॅपल कंपनीकडून फोन हॅकिंग अलर्ट मेसेज आल्याचा दावा केला होता. यासंबंधी त्यांनी स्क्रीनशॉटही शेअर केला होता. सरकार प्रायोजित ‘हल्लेखोर’ आपले फोन हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अलर्ट मेसेजमध्ये म्हटले आहे. यानंतर शिवसेना (उद्धव गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. फोन हॅकिंगचा अलर्ट मेसेज मिळालेल्या खासदारांमध्ये शशी थरूर, सीताराम येचुरी, प्रियांका चतुर्वेदी, महुआ मोईत्रा यांच्यासह अनेक नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. या आरोपांनंतर लगेचच भाजप नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. तर हा अलर्ट मेसेज 150 देशांमध्ये गेला आहे. अॅपल कंपनीनेही एक निवेदन जारी केले होते, असे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.









