अनधिकृत जाहिरातप्रकरणी आठ कंत्राटदारांना सूचना : लिलाव प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीत लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटाची मुदत यापूर्वीच संपली आहे. नव्याने लिलाव करण्यासाठी अलीकडेच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र, कॅन्टोन्मेंट निवडणूक जाहीर झाल्याने लिलाव प्रक्रिया आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. पण जाहिराती लावू नयेत, अशा प्रकारची नोटीस कंत्राटदारांना दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीत विविध चौकात तसेच रस्त्याशेजारी 30 जाहिरात फलक बसविण्यात आले आहेत. या जाहिरात फलकांवर जाहिराती लावण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडून लिलाव प्रक्रिया राबविली जाते. मागील वर्षी प्रत्येक फलकानुसार लिलाव प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये आठ कंत्राटदारांनी सहभागी होऊन बोली लावली होती. लिलावाच्या कराराची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता नव्याने लिलाव करण्यासाठी हा प्रस्ताव कॅन्टोन्मेंटच्या सर्वसाधारण बैठकीत ठेवण्यात आला होता. लावलेले जाहिरात फलक हटविण्यापूर्वीच कॅन्टोन्मेंट बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली होती. अद्यापही अनधिकृत जाहिरात फलक हटविले नाहीत. तरीदेखील सर्व जाहिरात फलक हटविल्याचे सांगून निविदा प्रक्रियेला मंजुरी घेतली आहे. मात्र, सर्व जाहिरात फलक असल्याचे निदर्शनास आले आहे.
परवानगी न घेतल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
बाबत कॅन्टोन्मेंट कार्यालयात चौकशी केली असता जाहिरात फलक हटविण्यासाठी आठ कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 30 जाहिरात फलकांच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट बोर्डला वर्षाला 20 लाखांचा महसूल मिळतो. निविदेच्या कराराची मुदत संपल्याने लवकरच नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याकरिता कॅन्टोन्मेंट सभागृहात मंजुरी मिळाली असली तरी निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता लिलाव राबवता येत नाही. पण अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यासाठी कॅन्टोन्मेंटने कंत्राटदारांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच जाहिरात फलक लावण्यासाठी कॅन्टोन्मेंटकडून परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला असल्याचे सांगण्यात आले.









