लेखा स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा : 9 कोटी 28 लाख महसूल जमा
बेळगाव : महानगरपालिकेकडे जमा होणारा महसूल आणि खर्च करण्यात आलेली रक्कम याबाबत लेखा स्थायी समितीच्या बैठकीत लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. यावेळी 9 कोटी 28 लाख रुपये महसूल जमा झाला तर 7 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीमध्ये जुन्या करवसुलीबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लेखा स्थायी समितीची बैठक सोमवारी झाली. लेखा स्थायी समितीच्या अध्यक्षा सविता मुरगेंद्रगौडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मागीलवेळी चर्चा झालेल्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर नवीन विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. एलईडी बल्ब बसविण्याचे काम अजूनही अर्धवट आहे. ते तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप बदलला
मागील बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या वाहनांमध्ये पेट्रोल व डिझेल ज्या पेट्रोलपंपावरून भरण्यात येत होते, त्यामध्ये बदल करून दुसऱ्या पेट्रोलपंपाला ठेका द्यावा, असे सांगण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप बदलला असून दुसऱ्याला ठेका दिल्याचे सांगितले. किओनेक्स या कंपनीलाच शहरातील विद्युत बल्ब तसेच इतर कामे देण्यात आली आहेत. याबाबत नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृहामध्ये ठराव करून त्यामध्ये बदल करता येतो. मात्र तोपर्यंत त्यांना काहीवेळ कंत्राट वाढवून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महानगरपालिकेच्या वाहनांना जीपीएस बसविण्याबाबतही चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटीअंतर्गत काही वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे. मात्र ते किती वाहनांना बसविले आहे, याची माहिती तातडीने बैठकीत दिली नाही. त्यामुळे अध्यक्ष व नगरसेवकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली. याची माहिती मागवून लवकरच देऊ, असे आश्वासन देण्यात आले. या बैठकीमध्ये अधिक महसूल वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली. याचबरोबर काही ठिकाणी बेकायदेशीर कामे सुरू आहेत. त्या कामांबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी काहीजणांना महापालिकेच्या जागांवर इमारती बांधण्यास दिल्या आहेत. त्याची मुदत संपल्यानंतर त्या महानगरपालिकेकडेच वर्ग होणार आहेत. त्यामुळे त्या इमारतींना बेकायदेशीर म्हणता येणार नाही, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, नगरसेविका आफ्रोज मुल्ला, महापालिका उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.









