सत्ताधाऱ्यांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस कन्नड व इंग्रजीमध्ये देण्यात आल्याने मराठी नगरसेवकांनी याला विरोध केला होता. त्यामुळे त्यांनी नोटिसा स्वीकारल्या नव्हत्या. परिणामी बुधवार दि. 16 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस शनिवारी नगरसेवकांच्या घराच्या भिंतीवर चिकटविण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर नोटीस चिकटवून जबाबदारी झटकली आहे. सत्ताधारी नगरसेवकांनी केलेली मागणी डावलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे.
महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक दि. 16 रोजी होणार आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सत्ताधारी भाजप पक्षाच्या नगरसेवकांनी मराठीमधून नोटीस देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. त्यावेळी महापौर शोभा सोमणाचे यांनी पुढील बैठकीत नोटीस मराठी, कन्नड व इंग्रजी या तिन्ही भाषांतून देण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र सदर मागणी फेटाळण्यात आल्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांसमोरच पेच निर्माण झाला आहे. नगरसेवकांच्या मागणीला झिडकारण्यात आल्याने आगामी बैठकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत चर्चेसाठी अजेंड्यावर घेतल्या जाणाऱ्या विषयांची माहिती मिळावी, त्याअनुषंगाने बैठकीमध्ये चर्चा करणे सोयीचे होईल व अजेंड्यावरील विषय लक्षात येतील, यादृष्टिने सत्ताधारी गटातील मराठी नगरसेवकांनी ही मागणी केली होती. मात्र सत्ताधारी गटातीलच नगरसेवकांच्या मागणीला फटकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे बहुतांश सदस्यांनी बैठकीची नोटीस नाकारली होती. त्यामुळे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बैठकीच्या नोटिसी मराठी नगरसेवकांच्या घरांच्या भिंतींवर चिकटवून जबाबदारी झटकली आहे. यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.









