संसदेच्या शिष्टाचार समितीचा अहवाल लोकसभाध्यक्षांना सादर होणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
तृणमूल काँग्रेसच्या वादग्रस्त खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभेचे सदस्यत्व काढून घेण्यात यावे, अशी सूचना संसदेच्या शिष्टाचार समितीने केली आहे. मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेणे, तसेच संसदेने दिलेल्या लॅपटॉपचा दुरुपयोग करण्याचा आरोप आहे. शिष्टाचार समितीच्या 10 सदस्यांपैकी 6 सदस्यांनी मोईत्रा यांचे खासदारपद काढून घेण्याच्या पक्षात तर 4 सदस्यांनी विरोधात मतदान केल्यामुळे बहुमताचा निर्णय खरा ठरणार आहे. आता हा अहवाल लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर करण्यात येणार आहे. ते त्यावर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे बव्हंशी मोईत्रा यांना खासदारपद गमवावे लागणार हे स्पष्ट दिसते, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
आरोप-प्रत्यारोप
मोईत्रा यांच्यासंबंधीचा समितीचा अहवाल बुधवारीच वृत्तपत्रांमध्ये फुटला होता, असा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी मोईत्रा यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्रही पाठविले होते. अहवाल फुटणे हा संसदीय समितीच्या नियमांचा भंग असल्याचे प्रतिपादन त्यांनी पत्रात केले होते. विरोधी पक्षांच्या काही नेत्यांनीही यासंबंधी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता अधिकृतरित्या अहवालाचा आशय प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे मोईत्रा यांचे खासदारपद धोक्यात आले आहे.
प्रकरण काय आहे?
महुआ मोईत्रा या तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील खासदार आहेत. त्यांनी काही काळापूर्वी लोकसभेत अदानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच त्यांच्या मतदारसंघाशी संबंधित नसलेले इतरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. हे प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी हिरानंदानी नामक उद्योगपतीकडून लाच स्वीकारली होती, असा आरोप होता. तसेच संसदेने मोईत्रा यांना दिलेल्या लॅपटॉपचाही त्यांनी दुरुपयोग केल्याचा आरोप होता.
प्रकरण शिष्टाचार समितीकडे
हे प्रकरण संसदेच्या शिष्टाचार समितीकडे पाठविण्यात आले होते. समितीने मोईत्रा यांना चौकशीसाठी पाचारण करुन अनेक प्रश्न विचारले. मात्र, त्यांची समर्पक उत्तरे न देता त्यांनी आपल्याला खासगी प्रश्न विचारण्यात आले, असा आरोप करत पत्रकार परिषदेत समितीच्या बैठकीत झालेले कामकाज उघड करुन आणखी एका शिष्टाचाराचा भंग केला. बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनीही समितीच्या कामकामाची माहिती बाहेर फोडल्यामुळे त्यांच्या विरोधातही अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. शिष्टाचार समितीने मोईत्रा यांनी शिस्तभंग केल्याच्या संदर्भात हा अहवाल सज्ज केला आहे.
भाजप खासदाराकडून तक्रार
मोईत्रा यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी शिष्टाचार समितीकडे आक्षेपपत्र सादर केले होते. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी समितीने केली. प्रकरणात तथ्य आढळल्याने मोईत्रा यांच्यासंबंधी अहवाल लिहून त्यात त्यांचे खासदारपद रद्द करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पुढे काय होणार?
मोईत्रा यांच्यासंबंधीचा अहवाल हाती आल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. त्यांनी अहवालातील सूचना मान्य केल्यास मोईत्रा यांना लोकसभेचे खासदारपद आणि त्यामुळे मिळणाऱ्या सोयी-सुविधा सोडाव्या लागतील. या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येत नाही, असे विधितज्ञांचे मत आहे.









