बेळगाव : बेकायदा तांदूळ वाहतूक प्रकरणी गांधीनगर येथील गोदाममालक व ट्रकचालकाला मार्केट पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येणार असून इतक्या मोठ्या प्रमाणात तांदूळ कोठून जमविण्यात आला व तो कोठे नेण्यात येत होता? याची माहिती मिळविण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी मल्लाप्पा गाणगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केए 22 ए 8564 क्रमांकाचा ट्रकचालक द्यामप्पा यल्लाप्पा जिरळी, रा. मोहरे, ता. बैलहोंगल व गोदाम मालक विश्वजित दीपक पाटील, रा. खडेबाजार-शहापूर या दोघांवर अत्यावश्यक सेवा कायदा 1995 चे कलम 3, 7 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व सहकाऱ्यांनी ट्रकचालक द्यामप्पाची चौकशी केली असता प्रत्येकी 30 किलोची 302 पोती अन्नभाग्यचा तांदूळ आपण गांधीनगर येथील गोदामातून आणल्याची कबुली दिली आहे. हे गोदाम विश्वजित पाटील यांचे आहे. त्यामुळे या दोघांनाही भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार नोटीस दिली आहे. पोलिसांनी 3 लाख 38 हजार 850 रुपये किमतीचा तांदूळ साठा व तांदूळ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला 5 लाख रुपयांचा ट्रक जप्त केला आहे. बेळगाव शहर व जिल्ह्यात रेशनच्या तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. गावोगावी फिरून स्वस्तात तांदूळ जमा करून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात त्या तांदळाची चढ्या भावाने विक्री केली जाते.
अपघातामुळे बेकायदा तांदूळ वाहतूक उघडकीस
ज्या ट्रकमध्ये बेकायदा तांदूळसाठा आढळला, त्या ट्रकची एका कारला धडक बसून अपघात झाला होता. मंगळवार दि. 8 एप्रिल रोजी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास आझमनगर येथे ही घटना घडली होती. अब्दुलखादर महम्मदहुसेन शमशेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात ट्रकचालकाविरुद्ध अपघातासंबंधीही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त निरंजन राजे अरस यांनी ही माहिती दिली आहे. या अपघातानंतरच बेकायदा तांदूळ वाहतूक उघडकीस आली आहे.









