मोरजी येथील बंगल्याचा व्यावसायिक वापर : पर्यटन खात्याच्या कार्यालयात 8 डिसेंबर रोजी सुनावणी
प्रतिनिधी /पणजी
माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या मोरजी-पेडणे येथील बंगल्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचे पर्यटन खात्याला आढळून आले आहे. या प्रकरणी पर्यटन खात्याने त्यांना नोटीस बजावली असून त्यांना 8 डिसेंबर रोजी सुनावणीसाठी हजर रहाण्यास बजावले आहे.
खात्याच्या नियमांनुसार व्यावसायिक वापर होत असलेल्या घरांची किंवा बंगल्यांची पर्यटन खात्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. तशी नोंदणी न करताच त्या बंगल्याचा व्यावसायिक उपयोग होत असल्याचे खात्याला आढळून आले आहे. पर्यटन खात्यातर्फे 11 नोव्हेंबर रोजी बंगल्यास भेट देऊन तपासणी केली असता त्याचा व्यावसायिक वापर होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई का करण्यात येऊ नये? अशी विचारणा नोटिसीतून खात्याने केली आहे.
येत्या 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. पर्यटन खाते कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहून बाजू मांडावी आणि स्पष्टीकरण द्यावे, असे नोटिसीतून युवराज सिंग यांना कळवले आहे. या प्रकरणी कोणतेही लेखी तोंडी स्पष्टीकरण न दिल्यास आणि सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई म्हणून रु 1 लाखापर्यंचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचा इशाराही नोटिसीद्वारे देण्यात आला आहे. पर्यटन खात्याचे उपसंचालक राजेश काळे यांनी सदर नोटीस बजावली असून ती रजिस्टर्ड पोस्टने युवराज यांना पाठवण्यात आली आहे.
वरचा वाडा मोरजी येथे असलेला युवराज सिंग याचा बंगला पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ म्हणून वापरात असल्याचे नोटिसीत स्पष्ट केले आहे. सिंग यांनी ‘होम स्टे’ बाबतचे ट्टिट केले होते. त्याचा पुरावा नोटिसीतून देण्यात आला आहे. शिवाय गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायदा 1982नुसार हा ‘होम स्टे’ नोंदणीकृत नसल्याचे नोटिसीतून युवराज यांच्या लक्षात आणून दिले आहे. युवराज सिंग यांनी नोंदणी न केल्यास किंवा सुनावणीस गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.








