शनिवारी बैठकीत होणार नोटीसवर चर्चा : महानगरपालिकेच्या कारभारामुळे संताप व्यक्त
बेळगाव : महानगरपालिकेची सर्वसाधारण बैठक शनिवार दि. 16 रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मराठी नगरसेवकांना मराठीतूनच नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र ती नोटीस अधिकृत आहे की नाही, हाच आता संशोधनाचा विषय आहे. कारण या नोटीसवर सही, शिक्का काहीच नाही. त्यामुळे अधिकृत म्हणायची की नाही, असा प्रश्न पडला आहे. मराठीतून नोटीस द्यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. पुढील बैठकीत देऊ, असे आश्वासन देण्यात आले. मात्र आतापर्यंत नोटीस मराठीतून देण्यात आलीच नव्हती. मात्र शनिवारी होणाऱ्या बैठकीच्या मुख्य नोटीसबरोबर त्याला जोडूनच एक मराठीतून नोटीस दिली गेली आहे. पण त्यावर कोणाताही शिक्का नाही किंवा स्वाक्षरीही नाही. त्यामुळे ती नोटीस अधिकृत म्हणायची की नाही? असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
मराठी भाषिकांच्या या मागणीवर जोरदार चर्चा झाली. भाषांतरकार नसल्यामुळे नोटीस देण्यात आली नाही, असे उत्तर देण्यात आले. त्यावेळी पुढील बैठकीत तिन्ही भाषांमधून नोटीस दिली जाईल, असे सांगण्यात आले. मागील बैठकीवेळी मराठी नगरसेवकांनी नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांच्या घरावर नोटीस चिकटविण्यात आल्याचा संतापजनक प्रकारही घडला होता. एकूणच हे प्रकरण चिघळतच आहे. यापूर्वी ज्याप्रकारे नोटिसा देण्यात आल्या त्याप्रकारेच द्याव्यात, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनीही केली. त्यावेळी तिन्ही भाषांतून नोटिसा दिल्याचे उघडकीस आले होते. असे असताना होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस देताना त्यावर शिक्का तसेच स्वाक्षरी नसल्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. केवळ मराठी भाषिकांची मते घेऊन मराठी भाषिकांना दुजाभाव देण्याचा प्रकार असल्याचे यावरून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे बैठकीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
सभागृहात सर्वात जास्त मराठी भाषिक नगरसेवक
बेळगाव महापालिकेवर नेहमीच मराठी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. आता भाजपचे वर्चस्व असले तरी सभागृहात सर्वात जास्त मराठी भाषिक नगरसेवक आहेत. त्यामुळे तिन्ही भाषांतून नोटिसा द्याव्यात, अशी मागणी वारंवार करण्यात आली. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी आणि महापौर शोभा सोमणाचे यांनीही मराठीतून नोटीस देण्यात येईल, असे सांगितले. मात्र नोटीस दिली गेली नव्हती. त्यामुळे मागील बैठकीत म. ए. समितीच्या नगरसेवकांनी जोरदार आवाज उठविला. त्याला विरोधी पक्षानेही पाठिंबा दर्शविला होता.









