भारतीय जनता पक्षाने मोदींची गॅरंटी म्हणत लोकसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र जाहीर केले आहे. जाहिरनामा, वचननामा, संकल्प पत्र असे वेगवेगळे शब्द असले आणि निवडणुकीसाठी एखादी टॅग लाईन असली तर त्या पक्षाची दिशा, इच्छा आणि हेतू स्पष्ट होतात. आणि गरिबी हटाव, शायनिंग इंडिया, अच्छे दिन किंवा मोदी की गॅरंटी अशा टॅग लाईन मतदारांवर गारूढ घालतात. भाजपाने गेले काही वर्षे ओबीसींना जवळ केले आहे. महिला युवा अन्नदाता आणि ज्येष्ठ नागरिक यांना सतत चुचकारले आहे आणि मोदींनी या मंत्रीमंडळाची शेवटची कॅबिनेट घेताना ‘अबकी बार चारसौ पार’ चा नारा दिला आहे. खरे तर अशा घोषणा या पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्दिष्ट देण्यासाठी असतात आणि त्याचबरोबर आम्ही तिसऱ्यांदा विजयी होणार हे सूचित करण्यासाठी असतात. पण, मोदींनी अबकी बार चारशे पार या घोषणेला सर्वांनी घट्ट धरल्याने विरोधी इंडिया आघाडी 400 जागा मोदी जिंकणार की नाही याच घोळात घुटमळलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी अबकी बार मोदी हद्दपार असे म्हटले पण, त्यात जोर नव्हता. ठाकरेंची काही भाषणे ऐकली तर त्यातून ध्वनीत होते. मोदी सरकार तिसऱ्यांदा निवडून येणार. मोदींनी आर्थिक विश्वालाही आश्वासीत करताना म्हटले आहे, निवडणूक झाली की नॉन स्टॉप शंभर दिवसांचा धडाकेबाज कार्यक्रम हाती घेणार आहे. भारत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. पायाभूत सुविधा, रेल्वे विकास, जहाज बांधणी, वाहतूक, शेती सुधारणा, युद्ध सामग्रीची निर्यात, सरकारी कंपन्यांची बळकटी असे अनेक विषय मोदी सरकारच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे जगात युद्धाचे, महागाईचे वातावरण असताना भारतीय शेअर बाजार आणि विविध कंपन्या पाय रोवून नवे उच्चांक करताना दिसत आहेत. ग्रीन एनर्जी अर्थात हरित ऊर्जा आणि इलेक्ट्रीक व्हेईकल्स यावर सरकारने जोर दिला आहे. इथेनॉल वगैरे विषय आहेतच. ओघाने जर मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर या सर्व विषयांना चालना मिळेल आणि मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये शेअर बाजाराचा निर्देशांक लाखाचा आकडा पार करेल. पण, हे निकाल काय लागतो, कसा लागतो यावर अवलंबून आहे. मोदींनी दुसऱ्या टर्मनंतरही शंभर दिवसात अच्छे दिन असे म्हटले होते पण, ते शब्दार्थाने खरे ठरले नाही. दुसऱ्या टर्ममध्ये अवघ्या विश्वाला कोरोना संकटाला सामोरे जावे लागले. त्याचाही फटका बसला. पण, या महामारीला यशस्वी तोंड देत भारताने आपली अर्थव्यवस्था आणि मानवता यांचे दर्शन घडवले. भाजपाने स्त्रिया, शेतकरी, मध्यमवर्ग, गरीब, ज्येष्ठ नागरिक आणि युवक यांच्यावर भर दिला आहे. पंतप्रधान सौर विद्युत योजनेतून प्रत्येक पुटुंबाला 300 युनिट मोफत वीज अशी घोषणा करण्यात आली आहे. ज्यादाची वीज सरकार विकत घेणार आहे. थोडक्यात प्रत्येकाचे छप्पर वीज उत्पादक होणार आहे. काँग्रेस व इंडिया आघाडीने अनेक लोकप्रिय घोषणा केल्या आहेत आणि अनेक प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन मोदी सरकारला आव्हान दिले आहे. मोदी आणि भाजपा चारशे जागा जिंकणार का? या प्रश्नाचे उत्तर आज तरी नाही, असे दिसते आहे. देशातील विविध यंत्रणांनी जे सर्व्हे केले आहेत, मतदारांच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्या पाहता एन.डी.ए. 360 ते 370 जागापर्यंत जाते आहे. एन.डी.ए. ला चारशे पार हे स्वप्न साकारायचे तर दक्षिण भारतात म्हणजे कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू या दक्षिणेच्या राज्यात अतिशय उत्तम कामगिरी करावी लागेल. दुर्दैवाने तशी ती दिसत नाही. कर्नाटकात गेल्या लोकसभेत भाजपाला उत्तम यश मिळाले होते पण, यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपा तोंडावर पडल्याने दक्षिण भारतातील 130 जागांपैकी किती जागा भाजपा मिळवते यावर सारे अवलंबून आहे. भाजपाने कर्नाटकात डॅमेज कंट्रोल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेमुळे भाजपला कर्नाटकात 22 जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे. तसे झाले तरच दक्षिणेत भाजपाला थोडेफार यश मिळेल. ओपिनिअन पोल कर्नाटकात काँग्रेसला चार ते सहा जागा दाखवत आहे. तेलंगणात बीआरएसची हालत फारच वाईट झाली आहे. तेथे काँग्रेस सर्वात जास्त म्हणजे नऊ जागा आणि भाजपा पाच जागा जिंकेल, असे ओपिनिअन पोलमध्ये दिसते आहे. तामिळनाडूत डीएमके चाळीस पैकी वीस जागा जिंकून सर्वाधिक यश मिळवेल. भाजपा व काँग्रेस तेथे पाच पाच जागा मिळवतील तर आंध्रप्रदेशात 25 जागा आहेत. तेथे काँग्रेसला एकही जागा दिसत नाही आणि भाजपाला तीन जागा ओपिनिअन पोलमध्ये दिसत आहेत. केरळात 20 जागा आहेत. तेथे काँग्रेसला सर्वाधिक 15 जागा तर भाजपाला दोन जागा दिसत आहेत. एकूणच दक्षिणेत भाजपाची मदार पुन्हा कर्नाटकावर आहे. कर्नाटकात अपेक्षित यश आले नाही आणि दक्षिण भारतात 55 ते 60 जागा जिंकता आल्या नाहीत तर चारसौ पारचे स्वप्न तोंडावर पडेल. हे वेगळे सांगायला नको. ओघानेच काँग्रेस व इंडिया आघाडीचा दक्षिणेवर जोर आहे. ओपिनिअन पोल म्हणजे मतमोजणी किंवा निवडणूक निकाल नव्हेत. मतदानापर्यंत अनेक लहान मोठ्या घटना, घडामोडी, रूसवे फुगवे होत असतात ही प्राथमिक दिशा असते. मतदानानंतर जे कौल येतात ते यापेक्षा वेगळे असू शकतात आणि प्रत्यक्ष मतपेटीतून जे निकाल येतात ते खरे सार असते. हा निकाल बघायला जून महिना उजाडणार आहे. ओपिनिअन पोलमध्ये महाराष्ट्रात जे आकडे दाखवले आहेत, त्यामध्ये भाजप एक नंबर वर दिसत असला तरी मराठवाड्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगले दिवस दिसताहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांचा दबदबा राहणार आहे. तुलनेने अजित पवार, एकनाथ शिंदे यांना म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही आणि भाजपाचे 45 प्लसचे स्वप्नही पुरे होणारे नाही. मुंबई, कोकण, विदर्भात भाजपाला अच्छे दिवस येणार आहेत. असे चाचणी अहवालात दिसते. देशभर मोदी की गॅरंटी आणि राम मंदिरमुळे खुशी आहे. तर महागाई, बेरोजगारी यामुळे नाराजी पण आहे. बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार असे ओपिनिअन पोलमध्ये दिसते आहे तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण भाजपामध्ये येऊनही तेथे काँग्रेस विजयी होताना दिसते आहे. अजून मतदानाला, मतमोजणीला अवकाश आहे तोवर कोणता पाऊस पडतो, त्यात कोण भिजतो, कुणाला सहानुभूती मिळते, जरांगे पाटील समर्थक काय करतात, असे अनेक विषय आहेत. तूर्त मोदी येणार पण, चारशे पार नाह।r, असा सॅम्पल चाचणीचा अंदाज आहे.









