कायदा मोडल्यास कारवाई करणारच, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर
प्रतिनिधी/ सातारा
सुप्रीम कोर्टाने डॉल्बीला परवानगी दिलेली नाही. पारंपरिक वाद्याला परवानगी आहे, परंतु लोकांचा आग्रह पाहता लाऊड स्पीकरला परवानगी देऊ. डॉल्बीच्या गाडय़ा रस्त्यावर दिसता कामा नये, दिसल्यास उद्यापासून जप्त केल्या जातील. लाऊड स्पीकरमध्ये दोन कर्णे आणि दोन डेक फक्त दिसतील, डेसीबलची मर्यादा ओलांडणाऱयावर कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी गणेशोत्सव मंडळाना दिलेली आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 50 जणांना दहा दिवसासाठी तडीपरी करण्यात येणार आहे. तशी वेळ कोणावर येऊ देऊ नका असे ही त्यांनी आवाहन केले. तसेच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी गणेश विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिले.
अलंकार हॉल येथे गणेशोत्सव मंडळाची बैठक पोलीस उपअधीक्षक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, मुख्याधिकारी अभिजित बापट, महावितरणचे अभियंता जितेंद्र माने, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, काँग्रेसच्या धनश्री महाडिक, सुषमा राजेघोरपडे, धनंजय जांभळे, ऍड. प्रशांत खामकर, इरफान बागवान, युनूस बागवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत अरबाज शेख, ऍड. खामकर, धनंजय जांभळे, श्रीकांत शेटय़े, नरेंद्र पाटील, चंद्रकांत मोरे, मधुकर घाडगे, गणेश दुबळे, माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी सूचना मांडल्या.
रात्री 12 नंतर वाद्य वाजवण्यास बंदी
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर म्हणाले, सगळ्यानी सूचना मांडल्या आहेत, त्या नेहमीच्याच आहेत. शासनाने यावर्षी गणेशोत्सव जल्लोषमध्ये साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. स्पीकर परवाना विनामूल्य आहे. मिरवणूक मार्ग ठरवून दिलेले आहेत. स्वागत कमानी आणि इतर कमानी संदर्भात नगरपालिका त्यास परवानगी देईल. पोलिसांची एनओसी द्यायची की नाही हे पोलीस ठरवतील, पारंपरिक वाद्य वाजवायचे इतर कोणत्याही वाद्याला परवानगी नाही. रात्री 12 ला वाद्य बंद पाहिजेत. येथे डॉल्बीचा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टाचे नियम आहे त्यानुसार बंदी राहील. आपण पारंपारिक वाद्याला परवानगी देऊ. आपल्या सगळ्यांचा आग्रह असल्याने लाऊड स्पीकर परवाना देऊ, पण डॉल्बीच्या गाडय़ा मिरवणुकीत आणायच्या नाहीत. त्या गाडय़ाना आरटीओ परवाना नसतो. ज्या ठिकाणी गाडय़ा दिसतील त्याच ठिकाणी जप्त करणार आहे. लाऊड स्पीकरला दोन कर्णे आणि दोन बॉक्सला परवानगी देत आहोत. मात्र, आवाजाचे निर्बध आहेत. प्रत्येकाचे डेसीबल मोजले जाईल, ज्याचा मोठा आवाज येईल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. शहरात शांतता कमिटी सदस्यांना ओळखपत्र दिले जाईल, असे आश्वासन देत ते पुढे म्हणाले, गणपती मंडळांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, पोलीस स्टेशनला परवानगी अर्ज करावा, आता दोन दिवसांनी दहीहंडी उत्सव आहे. त्यानंतर इतर उत्सव येत आहेत. मला या शहरात सामजिक कार्यकर्ते सूचना करताना दिसतात परंतु सामाजिक काम करताना कोणी दिसत नाही. सामाजिक कार्यकर्त्यानी जास्तीतजास्त सीसीटीव्ही बसवा आम्ही उद्घाटनाला येऊ, व्यापाऱयांची बैठक घेतली त्या बैठकीत त्यांना सूचना दिल्या आहेत.
धार्मिक भावना दुखावणारे देखावे नकोत
गणपती स्थापना करतो तेथे सीसीटीव्ही बसवा, स्टेज उंच असावे, तेथे कार्यकर्त्यांच्या डय़ुटी लावाव्यात, गप्पा मारत बसले तरी पोलीस त्रास देणार नाहीत, गणपती उत्सवात चोऱया प्रमाण कमी असते. पण त्या आधी आठ दिवसात चोऱया वाढतात आणि नंतरही वाढतात. त्यासाठी आपणही सतर्क रहावे. रोडवर वाहतूक अडथळा होईल अशी कृती करू नये, गणेशमूर्ती किती उंच असावी, मिरवणुकीवेळी मूर्ती वायरीला लागणार नाही, विटंबना होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मंडळाचा देखावा कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असा नसावा, मिरवणूक लवकर सुरू करावी, आम्ही गणराया कमिटी स्थापन करणार आहे. त्या मंडळाचा देखावा कसा आहे. व्यवस्था कशी आहे, मिरवणूक कशी काढली हे तपासणी करून त्या मंडळांचा सत्कार करून गौरव केला जाईल. मिरवणूक मार्गावर इतर धर्मीय स्थळे असतात. त्यांना त्रास होऊ नये याची दक्षता मंडळानी घ्यावी.
शांततेत गणेशोत्सव साजरा करावा
सण उत्सव धूमधडाक्यात साजरा झाला पाहिजे पण जे कोणी नियम मोडतात. त्यावर आमची नजर असणार आहे. पोलिसांचे ड्रोन कॅमेरे लक्ष ठेऊन आहेत. दारू पिऊन कार्य करणाऱया कार्यकर्त्यांवर मंडळानीच कार्यवाही करावी अन्यथा पोलीस कारवाई करतील. आम्ही प्रतिबंध कारवाईला सुरुवात केली आहे. काही व्यक्ती जास्त त्रास दायक ठरत असेल तर त्यास अटक केली जाईल. 50 लोकांची यादी काढली आहे. त्या लोकांना 10 दिवसासाठी तडीपारी करत आहोत. त्यात आपला कोणाचा नंबर लागू नये. याची दक्षता घ्यावी. तसेच गुन्हा दाखल असावा असेही नाही. सौजन्याने शांततेत वागला तर आम्ही शांतपणे सहकार्य करू, पण तुम्ही गोंधळ केला तर कायदेशीर कारवाई करू, असे ही त्यांनी बजावले. तसेच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ही पालिका प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिले.
दुबळेंच्या प्रश्न, नरेंद्र पाटील यांचे उत्तर
कॅप्टन शिंदे पोलीस चौकीच्या परिसरात दत्त मंदिर बांधले आहे, तसे बांधता येते का?, त्याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी गणेश दुबळे यांनी केली त्यावर नरेंद्र पाटील म्हणाले, ते शासकीय जागेत मंदिर नसून कॉलनीतील लोकांनी सार्वजनिक वर्गणी काढून बांधले आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, असा खुलासा केला.








