विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांचा टोला : कारभाराबाबत तीव्र नाराजी
बेळगाव : एलअॅण्डटीकडे शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविल्यापासून पाणीपुरवठ्याचे तीनतेरा झाले आहेत. पाण्यासाठी अधिकाऱ्यांना संपर्क साधल्यास शटडाऊन असल्याचे एकच उत्तर मिळते. त्यामुळे एलअॅण्डटीऐवजी सदर कंपनीचे नाव ‘शटडाऊन’ ठेवा असा मिश्कील टोला महापालिकेचे विरोधी गटाचे नेते मुजम्मील डोणी यांनी एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांना लगावला. यामुळे एलअॅण्डटी अधिकाऱ्यांची चुप्पी झाली तर नगरसेवक व इतर अधिकाऱ्यांमध्ये एकच हश्शा पिकला. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था आणि समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या मुख्य सभागृहात महापौर मंगेश पवार यांनी एलअॅण्डटी आणि केयुआयडीएफसीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर मंगेश पवार होते. व्यासपीठावर उपमहापौर वाणी जोशी, मनपा आयुक्त शुभा बी. होत्या. सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरींनी बैठकीचा उद्देश सांगत सभा सुरू केली.
एलअॅण्डटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून एलअॅण्डटीच्या सध्या सुरू असलेल्या कामांबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती करून दिली. शहराला हिडकल आणि राकसकोप जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. दोन्ही जलाशयांतून येणाऱ्या पाण्याबाबत व जलशुद्धीकरण प्रकल्प आदींविषयी माहिती दिली. हिडकल जलाशयापासून बसवणकोळ प्रकल्पापर्यंतच्या 8 कि.मी. ची जलवाहिनी जुनी असून 5 कि. मी. पर्यंत जलवाहिनी घालण्यात आली आहे. उर्वरित जलवाहिनीचे काम वनखात्याकडून परवानगी मिळत नसल्याने रखडले असल्याचे सांगितले. दोन्ही जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा असून 15 जूनपर्यंत शहराला पाणीटंचाई भासणार नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. शहरात एकूण 78 विहिरी, 789 कूपनलिका, 39 हँडपंप आहेत. उन्हाळ्यात राकसकोपमधून जास्त पाणी उपसा केला जात नाही. समर अॅक्शन प्लॅनअंतर्गत हिडकल जलाशयातून पाण्याचा अधिक उपसा केला जातो. 2026 पर्यंत शहरातील 24 तास पाणी योजना पूर्ण केली जाईल, असे यावेळी एलअॅण्डटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी सभागृहात सांगितले.
यानंतर विरोधी गटनेते मुजम्मील डोणी म्हणाले, एलअॅण्डटी अधिकाऱ्यांचे बोलणे केवळ ऐकण्यापुरते कानाला बरे वाटते. मात्र प्रत्यक्षात नागरिकांना अनेक वाईट अनुभव येत आहेत. पाणी वेळेत मिळत नसल्याने नागरिक नगरसेवकांच्या नावाने शिमगा करत आहेत. याबाबत विचारणा करण्यासाठी एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता शटडाऊन असल्याचे उत्तर दिले जात आहे. या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांकडे दुसरे कोणतेच उत्तर नाही. त्यामुळे एलअॅण्डटीऐवजी ‘शटडाऊन’ असे नाव ठेवल्यास बरे होईल, असा टोला त्यांनी लगावला.









