मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी, सज्जतेच्या सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
लवकरच पावसाळा सुरू होईल. त्यामुळे पिकांचे रक्षण आणि इतर खबरदारी उपाययोजना करा, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली. मी केवळ सूचना देत नाही; इशारा देत आहे. दिलेल्या सूचनांची परिणामकारक अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे.
मंगळवारी विधानसौधमध्ये सिद्धरामय्या यांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतींच्या सीईओंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या अनेक सूचना केल्या. मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. पावसामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. वीज पडून काही जणांचा बळी गेला आहे. अशा घटना रोखण्यासाठी खबरदारी उपाय करा. तुमच्याजळ अनुदान आहे. हवे असेल मागणी करा. मदतकार्य हाती घेण्यास कोणतीही अडचण नाही. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीडनाशकांचा पुरवठा करावा. हावेरी गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती नको, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.
पूर्वतयारी बैठका घ्या, कामाला लागा!
पावसामुळे विद्युत तारांवर, रस्त्यावर झाडे कोसळल्यास ते शक्य तितक्या लवकर हटवावे. विद्युत खांब कोसळल्यास, ट्रान्स्फॉर्मर खराब झाल्यास, पूल खराब झाल्यास. शालेय वर्गखोल्या पडझडीच्या स्थितीत असतील तर तातडीने उपाययोजना करा. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळता येतील. केवळ कार्यालयात बसून काम करणे शक्य नाही. पूर्वतयारी बैठका घेऊन कामाला लागा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
कामात कोणतीही कसर सोडता कामा नये. बजबाबदारीमुळे दुर्घटना घडल्यास त्याला अधिकारीच जबाबदार असतील. अशा अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करेल. निमित्त करून मदतकार्य राबविण्यास विलंब करणे योग्य नाही. जनतेने सरकारकडून बदल आणि सुधारणेची अपेक्षा बाळगली आहे. सरकारला नवी इमेज प्राप्त करून दिली पाहिजे. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्यास सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे कोणीही कामचुकारपणा करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत सीईओ ही पदे महत्त्वाची आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांची जबाबदारीही महत्त्वाची आहे. जिल्हाधिकारी तालुक्यांना भेट देत नसल्याच्या जनतेच्या तक्रारी असतात. त्यामुळे यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ जिल्हा केंद्रस्थानी बसून काम करून चालणार नाही. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
हवामान विभागाच्या संपर्कात रहा
मागील काही वर्षांपासून पूर, अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सातत्याने हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा. त्यांच्याकडून येणाऱ्या पूर्वसूचनांनुसार पुढील कार्यवाहीचे नियोजन करा. पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात बचावकार्य आणि मदतकार्यासाठी आधीच सज्जता ठेवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
भ्रष्टाचाराला वाव नको!
प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्यासाठी पारदर्शकपणा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांकडे पारदर्शक कामकाजाची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना प्रलंबित फाईलींची कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचना देण्यात आली आहे. सरकारी योजन जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले पाहिजे. सरकारच्या योजनांची नियोजित वेळेत अंमलबजावणी न केल्यास भ्रष्टाचाराला वाव मिळतो. शिवाय खर्चही वाढतो. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळणार नाही, याची दक्षता येण्याची सूचना दिल्याचे सिद्धरामय्या यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.









