वंदना पुसाळकर यांनी मिळवली डॉक्टरेट
जयंती नाल्याचे उगमापासून संगमापर्यंत सर्वेक्षण
कोल्हापूरः सुधाकर काशीद
जयंती नाला म्हटले की दुर्गंधी, दूषित पाणी आणि शहराच्या विकासातला मोठा अडथळा अशीच ओळख आता झाली आहे. फार जुना काळ नव्हे, अगदी 70-80 वर्षांपूर्वी जयंती हा नाला नव्हे तर खळाळत्या पाण्याने वाहणारी एक छोटी जिवंत नदी होती हे सारे जण त्यामुळे विसरूनच गेले आहेत. तिचे महत्त्व कोणाला माहित नसल्याने नदीचा नाला झाला आहे. पण कोल्हापूरच्या वंदना पुसाळकर या आर्किटेक्टनी जयंती नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंतचा अभ्यास करून डॉक्टरेट मिळवली आहे. जयंती नाला हा केवळ टिकेचा विषय नाही तर डॉक्टरेटचा विषय आहे हे त्यांची त्यांच्या अभ्यासातून दाखवले आहे.
जयंती नदी आता नाला म्हणून वाहत असली तरी त्यांनी केलेला अभ्यास प्रदूषणाची कारणे त्यावरच्या उपाययोजना या आधारे जयंती नाला पुन्हा जयंती नदी म्हणून वाहू लागेल असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. बेळगावच्या विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने त्यांना या प्रबंधावर पी. एचडी प्रदान केली आहे. या प्रबंधाच्या आधारे केवळ जयंतीच नव्हे तर अन्य गावातील छोटे छोटे पाण्याचे प्रवाह याचे नाल्यात रूपांतर झाले आहे. त्यावरच्याही उपाययोजना आखणे शक्य होणार आहे.
कोल्हापुरातला जयंती नाला (नदी) कात्यायनीच्या डोंगरात उगम पावतो. व उपनगरातून शहरातील मध्यवर्ती भागातून वाहत जाऊन पंचगंगा नदीला जाऊन मिळतो. ज्यावेळी कोल्हापूर शहर अगदी छोटे होते त्यावेळी या नाल्यावर पूलही नव्हते. पण जसे कोल्हापूर वाढत गेले तसे या नाल्यावर आठ पूल बांधावे लागले. शहराबाहेरचा हा नाला आजूबाजूला वस्ती वाढल्याने शहराच्या मध्यभागात आला. जेथून जयंती नाला उगम पावतो तो कात्यायनीचा परिसर म्हणजे तर एकेकाळचे शिकारीचे राखीव जंगल. तेथून बाहेर पडणारा हा नाला कात्यायणी मंदिराकडून उताराने उत्तरेस वाहू लागतो व मध्ये गोमती नाल्यात मिसळून पंचगंगा नदीला जाऊन मिळतो जयंती नाला ही पंचगंगेला येऊन मिळणारी एक छोटी उपनदीच होती. पण वाढत्या शहरीकरणात औद्योगिकीकरणात पाण्याचे मूल्य न जाणता नाल्याचा वापर सांडपाणी सोडण्यासाठी उघडपणे झाला.
अतिशय वाईट अशी की सार्वजनिक स्वच्छतागृहे या नाल्याच्या काठावरच बांधली गेली. त्यामागे तत्कालिक अडचणीवरचा तात्पुरता उपाय म्हणून जयंती नाल्याचा वापर झाला. जयंती नाल्याच्या आजूबाजूला जी वस्ती झाली, कारखाने उभारले त्याचे सांडपाणी उघडपणे नाल्याच्या उतारावरून नाल्यात सोडले जाऊ लागले. व मूळ स्वच्छ पाण्याच्या प्रवाहाचे 100 टक्के नव्हे 200 टक्के सांडपाण्यात रूपांतर झाले. ते पाणी पंचगंगा समशानभूमीजवळ पंचगंगा नदीत जाऊन मिसळू लागले.
पंचगंगा नदीच्या प्रदूषणावर खूप चर्चा झाली. जयंती नाला पंचगंगेच्या प्रदूषणातला मोठा घटक यावर शिक्कामोर्तब झाले. शहराच्या मध्यवस्तीतल्या नाल्यावर काय उपाययोजना करायची यावर चर्चा होत राहिली. जयंती नाल्यावर पाणी प्रक्रिया करून नदीत सोडण्यासाठी एसटीपी प्लांट उभारला गेला. पण जयंती नाल्याचे रूपांतर मूळ जयंती नाल्यात नदीत कसे करायचे हा प्रश्न आ वासुन कायम उभा राहिला.
आर्किटेक्ट वंदना पुसाळकर यांनी यावरच अभ्यास सुरू ठेवला .जयंती नदीचे रूपांतर नाल्यात करण्यात आपणच जसे जबाबदार .तसे, या नाल्याचे रूपांतर पुन्हा नदीत करण्याची जबाबदारी आपली कोल्हापूरकरांचीच या भावनेने त्यांनी तांत्रिक उपाययोजना सुचवल्या. नाल्याच्या उमापासून नदीत मिसळण्राया सर्व भागाची त्यांनी काना न कोपरा पाहणी केली व या नाल्याचे रूपांतर आपण पुन्हा नदीत करू शकतो या निष्कर्षा पर्यंत त्या आल्या. आणि त्यावरच पीएचडी केली.
जयंती नाल्यावर गेली चार वर्ष अभ्यास
जयंती नदीची ओळख जयंती नाला म्हणून होणे म्हणजे दुर्देव आहे. नैसर्गिक पाण्याचा एक थेंब आपण निर्माण करू शकत नाही. पण आपण तो नक्कीच जपू शकतो. याच भावनेतून जयंती नाला जयंती नदी म्हणून पुन्हा ओळखला जावा. नाल्याचे रूपांतर मूळ प्रवाहात व्हावे यासाठी मी गेली चार वर्ष त्यावर अभ्यास करत आहे.








