बेळगुंदीच्या शेतकऱ्यांनी रिंगरोडविरोधात मांडले म्हणणे : प्रांताधिकाऱ्यांनी नोंदवून घेतला जबाब : 60 पैकी 45 शेतकरी उपस्थित
बेळगाव : रिंगरोडसाठी शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता शेतकरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थित राहून, आपले म्हणणे मांडत आहेत. मंगळवारी बेळगुंदी येथील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आम्ही एक इंचही जमीन देणार नाही, असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील 32 गावांतील 1200 एकर सुपीक जमीन रिंगरोडसाठी घेतली जात आहे. त्यामुळे शेतकरी हा भूमीहीन होणार आहे. शेतकऱ्यांना नोटीस दिल्यामुळे आता प्रत्येक गावचे शेतकरी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडत आहेत. बहुसंख्य गावच्या शेतकऱ्यांनी जमीन देणार नाही, असा निर्धार केला आहे. मंगळवारी बेळगुंदी येथील 60 शेतकऱ्यांपैकी 45 शेतकरी उपस्थित होते. त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. आम्ही जमीन देऊ शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रिंगरोड करण्याची काहीच आवश्यकता नाही. मात्र येथील शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केल्याचा आरोप होत आहे. तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी पूर्ण ताकदीने विरोध दर्शविला होता. त्यामुळे हे काम रेंगाळले होते. त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नवीन नोटिफिकेशन प्रसिद्ध करून शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे नोटीस पाठविली आहे. 32 गावच्या शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने म्हणणे मांडण्यास तारीख व वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार आता शेतकरी आपले म्हणणे मांडत आहेत. मंगळवारी सकाळी 10.30 वाजता प्रांताधिकारी रमाकांत चव्हाण हे उपस्थित होते. त्यावेळी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी तशी नोंद केली आहे. 45 शेतकऱ्यांनी आम्ही जमीन देणार नाही, असे लेखी दिले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे नोंदवून घेताना अॅड. सुधीर चव्हाण, अॅड. शाम पाटील, अॅड. महेश मोरे, अॅड. एम. जी. पाटील, अॅड. प्रसाद सडेकर, आर. आय. पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









